मुंबई : विविध प्रभावी उपाययोजना केल्यामुळे मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांकात (एक्यूआय) दिनांक 26 नोव्हेंबर 2025 पासून सातत्याने सुधारणा होत असल्याचा दावा महानगरपालिकेने केला असला तरी मुंबईची हवा श्वास घेण्यास अजूनही धोकादायक आहे.
बृहन्मुंबई (मुंबई शहर व उपनगरे) क्षेत्रात वायू प्रदूषण नियंत्रणासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील 482 बांधकामांना ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी करण्यात आली आहे. पैकी 264 बांधकामांना ‘कामे थांबवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.
महानगरपालिकेने जारी केलेल्या 28 मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी, शासकीय, अशासकीय प्रकल्पांवर यापुढेही कारवाई सुरूच ठेवावी, असे सक्त निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. असे असले तरी सोमवारी 1 डिसेंबार रोजी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 187 होता, यामुळे पालिकेच्या उपाययोजनांवर मुंबईकरांकडून सवाल उपस्थित केले जावू लागले आहेत.
मुंबईत सध्या महापालिकेने जीआरपी-4 लागू केला आहे. हवा अतिवाईट किंवा गंभीर पातळीवर प्रदूषित असेल तेव्हा ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन 4 लागू केला जातो. त्यात प्रदूषण करणारी बांधकामे थांबवणे, छोटे उद्योग बंद करणे किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे, हवेत धूर सोडणाऱ्या ठिकाणांवर भरारी पथके पाठवणे या उपायांचा समावेश होतो. महापालिकेने मुंबईतील 70 संशयित ठिकाणांची तपासणी केली असता 53 ठिकाणी धूळ नियंत्रणाचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे निदर्शनास आले. परिणामी, माझगाव, देवनार, मालाड, बोरिवली पूर्व, चकाला-अंधेरी पूर्व, नेव्ही नगर, पवई आणि मुलुंड या परिसरांत जीआरपी-4 चे सर्व निर्बंध लागू करण्यात आले आहेत.