मुंबई: मुंबई आणि परिसरातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्यांवरील धूळ नियंत्रण, बांधकामाचा मलबा वाहतूक आणि विल्हेवाट, औद्योगिक प्रदूषण तसेच वाहनांच्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येणार आहेत.
रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी केवळ झाडलोट न करता व्हॅक्यूम क्लिनिंग यंत्रांचा वापर, स्प्रिंकलरद्वारे पाण्याची फवारणी आणि बांधकामाचा मलबा वाहून नेणाऱ्या वाहनांना झाकणे बंधनकारक करण्यावर भर देण्यात येईल.
मुंबई महानगर प्रदेशासाठी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्रित उपाययोजना आखण्यात येतील, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
या संदर्भातील मार्गदर्शक सूचना पुढील १५ ते २० दिवसांत तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मुंबई व परिसरातील हवा प्रदूषणासंदर्भात मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महापालिकांचे आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.
यावेळी मुंडे म्हणाल्या, प्रदूषणात या घटकांचा मोठा वाटा असल्याने रस्ते स्वच्छ करण्याच्या पद्धतीत बदल करावा लागेल. केवळ झाडूने धूळ एका बाजूला केल्याने प्रदूषण कमी होत नाही. त्यासाठी व्हॅक्यूम क्लिनिंग यंत्रांचा वापर वाढवावा.
तसेच स्प्रिंकलरद्वारे पाण्याची फवारणी करताना प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करण्याच्या शक्यतेचा विचार करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. महापालिकांनी हवा प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून घ्यावी.
रस्त्यांची स्वच्छता, धूळ नियंत्रण आणि प्रदूषणाचे नियमित निरीक्षण यासाठी तांत्रिक उपायांचा अवलंब करावा. शाळा आणि महाविद्यालयांच्या मोकळ्या मैदानांमध्येही धूळ कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करता येतील का, याचा विचार करण्याची सूचना मंत्री मुंडे यांनी केली.
मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर बांधकामे आणि पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. त्यातून निर्माण होणाऱ्या मलब्याची वाहतूक आणि विल्हेवाट हा प्रदूषण नियंत्रणातील महत्त्वाचा मुद्दा आहे. मलबा वाहून नेणाऱ्या वाहनांमध्ये बांधकाम साहित्य पूर्णपणे झाकलेले असावे.
वाहतूक पोलीस विभागाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना केवळ दंड करून सोडण्याऐवजी, आवश्यक ती पूर्तता केल्याशिवाय पुढे जाण्याची परवानगी देऊ नये, अशा सूचना मंत्री मुंडे यांनी यावेळी दिल्या. तसेच वाहतूक पोलीस विभागाने लागू असलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
वाहनांचे प्रदूषण आणि वाहतूक व्यवस्थेवर लक्ष
वाहनांची देखभाल, प्रदूषण नियंत्रणाची अंमलबजावणी आणि वाहतुकीदरम्यान निर्माण होणारी धूळ यावरही लक्ष देण्यात येणार आहे. विशेषतः बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांसह संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर प्रभावी कारवाई करण्याची आवश्यकता मंत्री मुंडे यांनी व्यक्त केली.
मुंबईला समुद्रकिनारा असल्यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होत असली, तरी प्रदूषण कमी करण्यासाठी केवळ नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून राहता येणार नाही. रस्त्यांवरील धूळ, बांधकामाचा मलबा, वाहनांचे उत्सर्जन आणि औद्योगिक प्रदूषण या घटकांवर समन्वित पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व महापालिका आणि संबंधित विभागांनी एकत्रितपणे कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.
प्रदूषणकारी उद्योगांवर कारवाई
औद्योगिक प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणीबरोबरच नियमांचे प्रत्यक्ष पालन होते की नाही, यावर लक्ष द्यावे.
वारंवार तपासणी करूनही नियमांचे पालन न करणाऱ्या उद्योगांबाबत कठोर भूमिका घ्यावी.
मात्र, प्रत्येक उद्योग बंद करणे हा उद्देश नसून आवश्यक सुधारणा करून घेणे महत्त्वाचे आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
शहरी भागातील हरित उपाययोजनांवरही भर
शहरांमध्ये वाढणारे बांधकाम, सिमेंटचे रस्ते आणि मोकळ्या जागांवरील धुळीमुळे पर्यावरणावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी हरित उपाययोजनांचा विचार करण्याची गरज असल्याचे मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले. इमारतींच्या छतांवर उद्याने विकसित करणे, बांधकामाच्या रचनेत पर्यावरणपूरक बदल करणे आणि शहरी भागातील मोकळ्या जागांमध्ये धूळ नियंत्रणाच्या उपाययोजना करणे याबाबत तांत्रिक अभ्यास करण्याची सूचनाही त्यांनी केली.