Mumbai Ahmedabad Bullet Train Pudhari
मुंबई

Mumbai Ahmedabad Bullet Train: बुलेट ट्रेनच्या तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे भुयारीकरण पूर्ण

हा बोगदा 417 मीटर लांब आणि 14.4 मीटर रुंद असून, बुलेट ट्रेन मार्गिकेवरील अप आणि डाऊन या दोन्ही मार्गिकांसाठी त्याची रचना करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे भुयारीकरण पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील अंबेसरी गावाजवळ यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. हा बोगदा 417 मीटर लांब आणि 14.4 मीटर रुंद असून, बुलेट ट्रेन मार्गिकेवरील अप आणि डाऊन या दोन्ही मार्गिकांसाठी त्याची रचना करण्यात आली आहे.

बोगद्याचे उत्खनन दोन्ही टोकांवरून नियंत्रित ड्रिलिंग आणि ब्लास्टिंग पद्धतीने करण्यात आले. उत्खननादरम्यान संरचनेची स्थिरता आणि सुरक्षितता निश्चित करण्यासाठी अत्याधुनिक मॉनिटरिंग प्रणाली आणि भू-तांत्रिक उपकरणांचा वापर करण्यात आला.

कंपन, उत्खननाच्या कामावेळी बोगद्याचे वर्तन आणि परिसरातील संरचनांवर होणारा परिणाम यावर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी सरफेस सेटलमेंट पॉइंट्स, 3 डी टार्गेट्स, स्ट्रेन गेजेस आणि सिस्मोग्राफ्स यांसारख्या रिअल-टाइम मॉनिटरिंग प्रणाली बसवण्यात आल्या होत्या.

बोगद्यामधील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी योग्य वायुवीजन व्यवस्था, अग्निसुरक्षा उपाययोजना, नियंत्रित प्रवेश व्यवस्था आणि सातत्यपूर्ण भू-तांत्रिक निरीक्षण यावर विशेष भर देण्यात आला. प्रकल्पातील एकूण 8 पर्वतीय बोगद्यांपैकी सात बोगदे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात असून एक बोगदा गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात आहे. गेल्या पाच महिन्यांत महाराष्ट्रात तीन पर्वतीय बोगद्यांचे उत्खनन पूर्ण झाले आहे.

बोगद्यांची सद्यस्थिती

  • एमटी-08 (350 मीटर) चे ब्रेकथ्रू 5 ऑक्टोबर 2023 रोजी पूर्ण झाले.

  • एमटी-07 (417 मीटर) चे ब्रेकथ्रू 1 जून 2026 रोजी पूर्ण झाले.

  • एमटी-06 (454 मीटर) चे ब्रेकथ्रू 3 फेब्रुवारी 2026 रोजी पूर्ण झाले.

  • एमटी-05 (1.5 किमी) चे ब्रेकथ्रू 2 जानेवारी 2026 रोजी पूर्ण झाले.

  • एमटी-04 मध्ये जवळपास 60% प्रगती झाली आहे.

  • एमटी-03 मध्ये उत्खननाचे 80% पेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे.

  • एमटी-02 आणि एमटी-01 चे कामही सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT