Adulterated Milk Seizure Pudhari
मुंबई

Adulterated Milk Seizure: मुंबईत येणाऱ्या दुधाची टोल नाक्यांवर चाचणी; निकृष्ट साठ्यावर कारवाई

11 हजार लिटर साठा जप्त

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेवर लगाम घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम राबवली. सोमवारी पहाटे शहरातील विविध प्रवेशद्वारांवर (टोल नाक्यांवर) करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 11,080.5 लिटर भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या दुधाचा साठा जप्त करण्यात आला.

या मोहिमेसाठी अधिकारी थेट दूध तपासणी यंत्रांसह नाक्यांवर दाखल झाले होते. मुंबईत प्रवेश करणाऱ्या दुधाच्या वाहनांची जागेवरच तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर डुबे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.

शहर व उपनगरातील नागरिकांना शुद्ध दूध मिळावे, या उद्देशाने मुलुंड (आनंद नगर), मुलुंड (एलबीएस मार्ग), ऐरोली, मानखुर्द, दहिसर, शिवडी आदी सहा ठिकाणी दुधाची तपासणी करण्यात आली.

रात्रभर चाललेल्या या मोहिमेत एकूण 195 नमुने तपासण्यात आले. त्यापैकी बहुतांश नमुने योग्य असले तरी काही नमुन्यांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या.

जप्त साठ्यातील निकृष्ट दर्जाचे दूध सील करून उत्पादकांकडे परत पाठवण्यात आले. मात्र, आरोग्यासाठी धोकादायक ठरलेले 90 लिटर ‌‘असुरक्षित‌’ दूध प्रशासनाने तत्काळ नष्ट केले.

या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी दुधात किंवा इतर अन्नपदार्थात भेसळीचा संशय आल्यास त्वरित तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. अशा प्रकारच्या मोहिमा भविष्यातही नियमितपणे राबवल्या जातील. यंदाची ही सुरुवात असून पूर्ण मुंबईत येणारे दूध तपासले. त्यासाठी नाक्यावर दूध तपासणी मशीन घेऊन अधिकारी दाखल झाले होते.
-श्रीधर डुबे पाटील, अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT