Mumbai Abortion Cases Pudhari
मुंबई

Mumbai Abortion Cases: मुंबईत दरवर्षी 20 हजारांहून अधिक गर्भपात; अल्पवयीन मुलींच्या घटनांनी वाढवली चिंता

तीन वर्षांत पाच हजारांनी घट; गर्भनिरोधकातील त्रुटी हेच प्रमुख कारण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत दरवर्षी 20 हजारांहून अधिक महिलांना गर्भपात करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील तीन वर्षांत गर्भपातांच्या एकूण संख्येत सुमारे पाच हजारांनी घट झाली असली, तरी अल्पवयीन मुलींच्या गर्भपाताच्या घटनांनी आरोग्य यंत्रणेसमोर नवे प्रश्न उभे केले आहेत. विशेष म्हणजे गर्भनिरोधकांचा अयोग्य किंवा अपुरा वापर तसेच गर्भनिरोधक अयशस्वी ठरणे हेच गर्भपातामागील प्रमुख कारण असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

महापालिकेकडून कुटुंबनियोजन आणि जनजागृतीचे विविध कार्यक्रम राबविले जात असले, तरी गर्भपाताचे प्रमाण अद्याप लक्षणीय असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.

19 वर्षांखालील मुलींचे गर्भपात चिंतेचा विषय

गर्भपातांच्या एकूण संख्येत घट होत असली तरी 19 वर्षांखालील मुलींच्या गर्भपाताच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. 2023-24 मध्ये 333 अल्पवयीन मुलींचे गर्भपात झाले होते. त्यानंतर 2024-25 मध्ये ही संख्या दुपटीहून अधिक वाढून 716 वर पोहोचली. तर 2025-26 मध्ये ती काहीशी घटून 365 इतकी नोंदविण्यात आली.

गर्भनिरोधकातील त्रुटी ठरत आहेत कारणीभूत

मुंबईतील गर्भपातांच्या घटनांमध्ये सर्वाधिक वाटा गर्भनिरोधक पद्धतीतील त्रुटींचा आहे. 2023-24 मध्ये गर्भनिरोधक अयशस्वी ठरल्यामुळे किंवा त्याचा अपुरा वापर झाल्यामुळे 22 हजार 149 महिलांना गर्भपात करावा लागला. 2024-25 मध्ये ही संख्या 19 हजार 495 इतकी होती, तर 2025-26 मध्ये 18 हजार 966 महिलांनी याच कारणामुळे गर्भपात केला.

गर्भपातामुळे होणारे मृत्यू रोखण्यात यश

गर्भपाताशी संबंधित मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला मोठ्या प्रमाणात यश आले आहे. 2017-18 मध्ये गर्भपातामुळे 19 महिलांचा मृत्यू झाला होता. मात्र अलीकडच्या काळात ही संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. 2023-24 मध्ये केवळ दोन महिलांचा मृत्यू झाला, तर मागील दोन वर्षांत गर्भपातादरम्यान एकाही महिलेचा मृत्यू नोंदविण्यात आलेला नाही.

हिंदू महिलांमध्ये गर्भपाताचे प्रमाण सर्वाधिक

मागील तीन वर्षांत मुंबईत एकूण 67 हजार 337 गर्भपाताच्या घटना नोंदल्या गेल्या. त्यामध्ये हिंदू धर्मीय महिलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आकडेवारी दर्शविते. 2023-24 मध्ये 25 हजार 835 वैद्यकीय गर्भपातांपैकी 20 हजार 195 गर्भपात हिंदू महिलांचे होते. 2024-25 मध्ये 20 हजार 950 पैकी 15 हजार 765, तर 2025-26 मध्ये 20 हजार 552 पैकी 14 हजार 342 गर्भपात हिंदू महिलांचे नोंदविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT