Crime News : दूध मागितल्यावर बाप झाला हैवान; ४ वर्षांच्या चिमुकल्याचा मारहाणीत मृत्‍यू file photo
मुंबई

Crime News : दूध मागितल्यावर बाप झाला हैवान; ४ वर्षांच्या चिमुकल्याचा मारहाणीत मृत्‍यू

दूध मागून रडत असल्याचा राग आल्याने वडिलांनी मुलाला बेदम मारहाण केली.

पुढारी वृत्तसेवा

mumbai 4 year child murder for milk father beaten to death

मुंबई : पुढारी ऑनलाईन मुंबईच्या पवई परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप मुलाचा जीव त्याच्या स्वतःच्या वडिलांच्या हातून गेला. दूध मागून रडत असल्याचा राग आल्याने वडिलांनी मुलाला बेदम मारहाण केली आणि संतापाच्या भरात त्याला दरवाज्यावर आपटले. या गंभीर दुखापतीमुळे मुलाचा मृत्यू झाला.

पत्नी १४ दिवसांपासून माहेरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास पवईतील गौतमनगर परिसरात घडली. मृत मुलाची ओळख चार वर्षीय यश अशी झाली आहे. यश हा विशेष गरजा असलेला (स्पेशल चाइल्ड) मुलगा होता आणि तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता.

घटना घडली तेव्हा घरात फक्त यश आणि त्याचे वडील राजेश सिंह उपस्थित होते. यशची आई गेल्या सुमारे १४ दिवसांपासून माहेरी गेली होती.

दूध मागितल्याने संतापला पिता

राजेश सिंह हा दारूच्या आहारी गेलेला असून त्याच्याकडे कोणतेही स्थिर काम नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याची पत्नी घरकाम करून करत होती.

घटनेच्या दिवशी यशने वडिलांकडे दूध मागितले. वेळेवर दूध न मिळाल्याने तो रडू लागला. याच कारणावरून संतापलेल्या राजेशने मुलाला निर्दयीपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रागाच्या भरात त्याने चिमुकल्याला उचलून दरवाज्यावर आपटले. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा

मुलाची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला वाचवण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही. काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालातही डोक्याला गंभीर मार लागून कवटीचे फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले. याच गंभीर दुखापतीमुळे मुलाचा मृत्यू झाल्याची पुष्टी अहवालात करण्यात आली आहे.

आरोपीला पोलिस कोठडी

घटनेनंतर आरोपी राजेश सिंह आपल्या बहिणीच्या घरी गेला आणि त्याने मुलाला मारहाण केल्याची कबुली दिली. हे ऐकताच त्याची बहीण घटनास्थळी पोहोचली. तेथील परिस्थिती पाहून ती हादरून गेली. त्यानंतर तिने तात्काळ पवई पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला १ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

समाजाला हादरवणारी घटना

या दुर्दैवी घटनेमुळे कौटुंबिक हिंसाचार, दारूचे व्यसन आणि मुलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्या वडिलांच्या कुशीत मुलाला सर्वाधिक सुरक्षित वाटायला हवे, त्याच वडिलांच्या हातून त्याचे आयुष्य संपले. यशच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT