आजपासून मुंबईत 10% पाणीकपात  pudhari photo
मुंबई

Mumbai Water Crisis : आजपासून मुंबईत 10% पाणीकपात

पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : तलावातील पाण्याची पातळी खालावल्यामुळे संपूर्ण मुंबई शहरात शुक्रवार 15 मेपासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी सध्या सुमारे 4 हजार 500 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र प्रत्यक्षात 4 हजार 100 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे अगोदरच 400 दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा असताना आता पाणीकपातीमुळे अजून 400 दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा भासणार आहे.

10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आल्यामुळे रोजच्या पाणीपुरवठ्यात 400 दशलक्ष लिटर पाण्याची घट होऊन मुंबईकरांना 4 हजार 100 दशलक्ष लिटर्सऐवजी 3 हजार 700 दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. सध्या कोणतीही कपात नसतानाही अनेक भागात पाण्याची मोठी टंचाई भासत असताना कपात झाल्यानंतर पाणीबाणी उद्भवण्याची भीती आहे.

पाणी बचतीचे कोणतेही निर्बंध नाही

मुंबईत पाणीकपात लागू केली असली तरी, पाणी बचतीचे कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाही. त्यामुळे पाण्याची बचत होणे अशक्य आहे. परिणामी पाण्याची मोठी तूट भासून मुंबईकरांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.

टँकर सज्ज

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मुंबई महापालिकेने आपल्या विभाग कार्यालयात टँकर सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांची तक्रार आल्यानंतर त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. टँकरची कमतरता असल्यास खासगी टँकरद्वारेही पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अभियंत्याने सांगितले.

  • आंघोळीसाठी शॉवरचा उपयोग न करता बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करा.

  • घरकामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका. त्याऐवजी भांड्यांमध्ये पाणी घेऊन कामे उरका.

  • वाहने ओल्या कापडाने पुसावीत.

  • आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नका. अशा सूचना महापालिकेने मुंबईकरांना केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT