Mumbai water shortage pudhari photo
मुंबई

Mumbai water shortage : कुठे कमी दाबाने, तर कुठे पाणीच नाही!

पाणीटंचाईने मुंबईकर त्रस्त, शनिवारपर्यंत टंचाईच्या बसणार झळा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई शहरातील काही भागात सुरू असलेल्या 10 टक्के पाणी कपातीची झळ संपूर्ण मुंबई शहरातील नागरिकांना सोसावी लागत आहे. अनेक भागात कमी दाबाने तर काही भागात पाणीच येत नसल्यामुळे मुंबईकर त्रस्त आहेत. हा त्रास शनिवारपर्यंत सहन करावा लागणार आहे.

पिसे येथील ‌‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम‌’चे वार्षिक परिरक्षणाचे काम हाती घेण्यात आल्यामुळे ही पाणी कपात लागू करण्यात आली आहे. ही कपात डॉकयार्ड क्षेत्रासह पायधुनी, मोहम्मद अली रोड, डोंगरी, भेंडी बाजार, संपूर्ण भायखळा परिसर, माझगाव, परळ, लालबाग, काळाचौकी, शिवडी, नायगाव, वडाळा, माटुंगा, सायन, अँटॉप हिल, पूर्व उपनगरात मुलुंड पूर्व, भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी, कुर्ला, चेंबूर, गोवंडी, शिवाजीनगर, बैंगनवाडी, मानखुर्द या परिसरात असली तरी याचा परिणाम संपूर्ण मुंबई शहरात झाला आहे.

अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे प्रत्येकापर्यंत पाणीच पोहोचत नाही. त्यामुळे नागरिकांना टँकर मागवावे लागत आहेत. या पाणी कपातीनंतर पश्चिम उपनगरातील अनेक भागात पाणीटंचाईची झळ पोहचत आहे.

पिसे येथील ‌‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम‌’चे वार्षिक परिरक्षणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शनिवारपूर्वी पर्यटनाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास पालिकेच्या जल अभियंता विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.

दररोज 500 दशलक्ष लिटरपेक्षा अधिक पाण्याची घट

शहराला दररोज पुरवठा होणाऱ्या पाण्यामध्ये तब्बल 500 दशलक्ष लिटरपेक्षा जास्त घट झाली आहे. शहराला सुमारे साडेचार हजार दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाण्याची दररोज गरज असताना, सध्या साडेतीन हजार दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे. अगोदरच 500 दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता असताना आता अजून 500 लिटर पाण्याची कमतरता झाल्यामुळे मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शनिवार सात फेब्रुवारीपर्यंत परिरक्षणाचे काम सुरू राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT