मुंबई : सुमारे सव्वादहा कोटींच्या फसवणुकीप्रकरणी दोन बंधूंविरुद्ध एल. टी. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अविश योगेश जैन आणि आलिश योगेश जैन अशी या दोघांची नावे असून त्यांच्यावर चांदीसह कॅशचा अपहार करुन एका चांदीच्या व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील तक्रारदार गिरगाव येथे राहत असून ते चांदीचे व्यापारी आहेत. त्यांची झव्हेरी बाजारात एक खासगी फर्म असून या फर्मच्या माध्यमातून ते होलसेलमध्ये चांदीसह दागिन्यांची विक्री करतात. त्यांच्याकडे अविश जैन हा त्यांच्याकडे कामाला होता. त्याच्यावर अकाऊंटसह सेल्सची जबाबदारी होती. काही वर्षांनंतर त्याने त्यांच्यासोबत पार्टनरशीप केली होती. सत्तर लाखांची गुंतवणुक करुन त्याने कंपनीत तीस टक्के पार्टनरशीप घेतली होती.
याचदरम्यान त्याच्यासह त्याचा भाऊ आलिश जैन यांनी कंपनीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केले होते. सॉफ्टवेअरमधील नोंदी डिलीट करुन कंपनीला प्रचंड नुकसान होत असल्याचे भासविले होते. गेल्या काही वर्षांत कंपनीला एक कोटीचे नुकसान झाले असून तक्रारदारांना सहा कोटी रुपये देणे बाकी असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला होता.
सदर प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी सर्व व्यवहारासह बँक स्टेटमेंटची पाहणी केली असता त्यात त्यांना 1 कोटी 17 लाख 50 हजार रुपयांचे 47 किलो चांदीचे ठोकळे, 4 कोटी 75 लाख रुपयांचे 146 किलो चांदीचे विविध दागिने तसेच 4 कोटी 30 लाखांचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या दोन्ही आरोपी बंधूंविरुद्ध एल. टी. मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आविश जैन आणि आलिश जैन यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.