Mumbai Cyber Crime  pudhari photo
मुंबई

Mumbai Cyber Crime : मुलुंड पोलिसांकडून आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश

२५५ सायबर गुन्ह्यांची उकल, सहा आरोपींना अटक

पुढारी वृत्तसेवा

कुर्ला : मोबाईल धारकांना एपीके फाईल्स पाठवून लाखो रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय सायबर टोळीला मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. गुजरात, यूपी आणि मुंबई येथून सहा आरोपीना यावेळी अटक करण्यात आली असून त्यांच्या अटकेमुळे देशभरातील २५५ सायबर गुन्ह्यांची उकल झाली आहे.

तीन महिन्यांपूर्वी मुलुंड परिसरात एका खासगी कंपनीत अशाच प्रकारे या आरोपीनी दहा लाखांची फसवणूक केली होती. कंपनी मालकांचे बनावट व्हॉट्सॲप प्रोफाईल तयार करून अनोळखी फोनवरून अकाऊंटला आरोपीनी फोन केला. यावेळी आरोपीनी एक बँक खाते पाठवून तत्काळ यामध्ये दहा लाख रुपये पाठवण्यास सांगितले.

मालकानेच सांगितल्याने अकाऊंटने तत्काळ संबंधित खात्यात हे पैसे पाठवले. काही वेळानंतर मालकाला ही बाब समजल्यानंतर आपण अशा प्रकारे कोणाला ही पैसे पाठवण्यास सांगितले नसल्याचे त्याने अकाउंटला सांगितले. आपली फसवणूक झाली असल्याचे या कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच त्याने याबाबत तत्काळ मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मुलुंड पोलिसांनी यामध्ये तत्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. तपासात दहा लाख रुपयांपैकी साडेपाच लाख रुपयांची रक्कम उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका बँक खात्यात वळवण्यात आल्याचे पोलिसांना आढळले. त्यानुसार पोलिसांनी मेरठ येथे जाऊन बँके खात्यातून पैसे काढणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गाझियाबाद,वडोदरा व कांदिवली येथून आणखी तीन आरोपींना अटक केली. या कारवाईसाठी उत्तर प्रदेश, गुजरात व राजस्थान पोलिसांच सहकार्य मिळाले.

२५५ गुन्हे आणि ७२ कोटींचे कनेक्शन उघड

  • पोलिसांनी आरोपींकडून ५ मोबाईल फोन आणि ५.५० लाख रुपयांची रोकड जप्त केली. एका आरोपीच्या मोबाईल फोनमध्ये ११ बँक खात्यांची माहिती मिळाली, ज्यांचे कनेक्शन २१ राज्यांमधील १८२ सायबर तक्रारींशी जोडलेले होते.

  • दुसऱ्या एका आरोपीच्या फोनमधून ४९ बँक खात्यांचे तपशील मिळाले, जे देशभरातील ७३ सायबर गुन्ह्यांशी संबंधित होते. या दोन्हीचा एकत्रित तपास केला असता एकूण २५५ सायबर गुन्हे उघडकीस आले, ज्यामध्ये तब्बल ७२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

टोळीची गुन्हे करण्याची कार्यपद्धती

आरोपी 'टेलिग्राम' ग्रुप्सचा वापर करून लोकांची बँक खाती व सिम कार्ड्स खरेदी-विक्री करायचे. बँक खातेदारांच्या मोबाईलमध्ये बनावट व धोकादायक एपीके फाइल्स इंस्टॉल करून आरोपी त्या खात्यांवर व ओटीपीवर पूर्ण नियंत्रण मिळवायचे. फसवणुकीचा पैसा अनेक खात्यांमध्ये वळवून तो रोकड स्वरूपात काढला जायचा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT