Mumbai Civic Negligence pudhari photo
मुंबई

Mumbai Civic Negligence : नालेसफाईसाठी आणलेले यंत्रच डोकेदुखी

वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव

पुढारी वृत्तसेवा

मुलुंड : नाल्यातील गाळ काढण्यासाठी आणण्यात आलेला भला मोठा जेसीबी गेल्या दोन महिन्यांपासून मुख्य रस्त्यावरच ठाण मांडून बसल्याने परिसरातील नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. नाला साफ करण्यासाठी आणलेले हे यंत्र आता नागरिकांसाठी डोकेदुखी बनला आहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

मुख्य रस्त्याच्या महत्त्वाच्या भागात जेसीबी उभा असल्याने वाहनांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र होत असून अपघाताचा धोका देखील निर्माण झाला आहे.

विशेषतः पावसाळ्यात धुरकट वातावरण त्यामुळे दृष्यमानतेचे प्रमाण कमी होणे, अशातच रस्त्यावर वाहनांची संख्या आणि पाण्याचे प्रमाण वाढत असताना एवढ्या मोठ्या यंत्र रस्त्यावर उभे करून ठेवण्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे दीर्घकाळ हे मोठे यंत्र रस्त्यावर उभे राहणे कितपत योग्य, असा सवाल उपस्थित होत आहे.

जेसीबी ज्या ठिकाणी उभा आहे, त्या परिसरात पाणी साचल्याचे दिसून येत आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास होण्यास पोषक परिस्थिती निर्माण झाली असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच सभोवताली सर्वत्र कचरा साचला असल्यामुळे मुख्य रस्त्यावरच अस्वच्छता निर्माण झाली आहे.

जबाबदारी कोणाची?

नाला साफसफाईचे काम कोणत्या कंत्राटदारामार्फत सुरू आहे, जेसीबी येथे किती दिवस ठेवण्याची परवानगी आहे, काम पूर्ण झाले आहे की अद्याप सुरू आहे आणि काम पूर्ण झाल्यानंतर यंत्र हटविण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल केला जात आहे.

पालिका व पोलीस प्रशासनाचा याकडे कानाडोळा

या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष आहे की नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. एवढ्या मोठ्या आकाराचे यंत्र दोन महिन्यांपासून मुख्य रस्त्यावर उभे असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याची दखल का घ्यावीशी वाटली नाही?त्याचबरोबर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यास वाहतूक पोलीस किंवा स्थानिक पोलीस प्रशासनानेही याची पाहणी करणे आवश्यक नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT