मुंबई : कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी एका खासगी कंपनीचा वरिष्ठ लेखा अधिकारी जयप्रकाश बसंतीलाल सोडानी याला समतानगर पोलिसांनी अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. नोकरी सोडून गेल्यानंतर त्याने कंपनीच्या 8 कोटी 69 लाखांचा अपहार केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यात त्याच्या पत्नीसह इतर काही खातेदारांचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांची लवकरच चौकशी होणार आहे.
यातील तक्रारदार बोरिवली परिसरात राहत असून शहरातील एका नामांकित कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते. याच कंपनीत जयप्रकाश हा वरिष्ठ लेखा अधिकारी म्हणून काम करत होता. कंपनीचे विश्वासू कर्मचारी असल्याने त्यांच्यावर कंपनीने अकाऊंट विभागाची संपूर्ण जबाबदारी दिली होती. त्यांच्याकडे कंपनीच्या बँक खात्याचे लॉगिन आयडी, युझर आयडी व पासवर्ड होते. 2019 साली तो नोकरीवर रुजू झाला व 2022 साली त्याने आपल्या पदाचा राजीनामा देऊन नोकरी सोडली होती. गेल्या वर्षी कंपनीचे ऑडिट करण्यात आले. त्याची जबाबदारी तक्रारदारावर सोपविण्यात आली होती.
कंपनीची सर्व बिले, बँक स्टेटमेंटची पाहणी केल्यानंतर त्यांना कंपनीच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपयांचे ऑनलाईन व्यवहार झाल्याचे दिसून आले. बँक स्टेटमेंटची पाहणी केल्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने एकाच अकाऊंटमध्ये ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. या बँक खात्यांची माहिती काढल्यानंतर त्यातील काही खाती जयप्रकाश सोडानी यांची असल्याचे उघडकीस आले. जयप्रकाशने स्वत:सह त्याची पत्नी कविता माहेश्वरी व इतर बँक खात्यांत पैसे पाठविले होते.
1 फेब्रुवारी 2023 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत जयप्रकाशने विविध बँक खात्यांत 8 कोटी 69 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. जयप्रकाशने राजीनामा दिल्यानंतर कंपनीच्या बँक खात्याचा दुरुपयोग करुन ही फसवणूक केली होती. याबाबत त्याची कंपनीकडून चौकशीही करण्यात आली होती.