मुंबई ः महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात येणाऱ्या होमियोपथी, आयुर्वेद आणि युनानी या विषयांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या चार फेऱ्यांनंतरही 965 जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी महाविद्यालय पातळीवर ऑनलाइन स्ट्रे फेरी मंगळवारपासूनच सुरू झाली असून 4 डिसेंबर रोजी निवड यादी जाहीर होणार आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 7 डिसेंबरपर्यंत प्रवेश घ्यायचा आहे.
बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी म्हणजेच बीएएमएस या अभ्यासक्रमासाठी राज्यातील 22 सरकारी आणि 123 खासगी अशा एकूण 145 महाविद्यालयांमध्ये राज्य कोट्यासाठी 9453 जागा उपलब्ध होत्या. चौथ्या फेरीअखेरीस त्यापैकी सरकारी महाविद्यालयांत 64 आणि खासगी महाविद्यालयांत 504 अशा 568 जागा रिक्त आहेत.
बॅचलर ऑफ होमिओपथिक मेडिसिन अँड सर्जरी म्हणजेच बीएचएमएस या अभ्यासक्रमासाठी राज्यातील एक सरकारी आणि 54 खासगी अशा 55 महाविद्यालयांमध्ये 3712 जागा उपलब्ध होत्या. यात सरकारी महाविद्यालयात 54 जागांचा समावेश होता. त्यापैकी 43 जागा भरल्या असून खासगी महाविद्यालयांत 3397 जागांवर प्रवेश झाले. त्यामुळे 390 जागा अजूनही रिकाम्या आहेत. तर युनानी औषधोपचार पद्धती शिकवणाऱ्या बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी म्हणजेच बीयूएमएस अभ्यासक्रमाची तीन सरकारी आणि चार खासगी महाविद्यालये आहेत.
या 7 महाविद्यालयांमध्ये मिळून 350 जागा उपलब्ध. त्यापैकी सरकारी महाविद्यालयांमधील 153 पैकी 151 आणि खासगी महाविद्यालयांमधील 197 पैकी 192 जागा भरल्या असून 7 जागा रिक्त आहेत. या तीनही अभ्यासक्रमांमध्ये रिक्त असलेल्या 965 जागांसाठी आता महाविद्यालयनिहाय स्ट्रे फेरी होणार आहे. दुसऱ्या स्ट्रे फेरीची निवड यादी 8 डिसेंबरला जाहीर होणार असून 9 आणि 10 डिसेंबरला या यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवायचा आहे.