Traffic Fine Collection
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आरटीओने घालून दिलेली ताशी 80 किलोमीटर आणि घाट सेक्शनमध्ये ताशी 40 किलोमीटरची वेग मर्यादा ओलांडणार्या एसटी चालकांच्या पगारातून लाखोंची दंड वसुली करण्यात आली आहे. एसटी चालकांकडून आतापर्यंत 6 कोटींपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला असून तो परत मिळावा, अशी मागणी एसटी चालक करीत आहेत. एकट्या ठाणे विभागाकडून 80 लाख रुपये दंड वसूल केला गेला आहे.
एसटी बस हे प्रवासी वाहतूक करणारे वाहन असून कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी बसेस 80 वेग मर्यादेवर लॉक केल्या आहेत. एसटीची सुटण्याची व पोचण्याची वेळ ठरवून दिलेली असते. कितीही वाहतूक कोंडी असली तरीही प्रवाशांना ठरवून देण्यात आलेल्या वेळेत उचितस्थळी पोहोचवायचे असते. काही प्रवाशांचा तर तिथून पुढचा प्रवास रेल्वे, बस, छोटी वाहने व विमानाचा असतो. अशा वेळी विशिष्ट परिस्थितीत प्रवाशांच्या विनंतीवरून रस्त्यावरची स्थिती बघून चालकांना लेन कटिंग करून पुढे जावे लागते.
कधीकधी रुग्णप्रवाशांना तसेच रात्रीच्या वेळी महिलाप्रवाशांना त्यांनी केलेल्या विनंती वरून मानवतेच्या दृष्टीकोनातून उचितस्थळी वेळेत पोहोचवायचे असते. एसटीच्या चालकांनी गर्भवती महिलांना सुद्धा वेळेत रुग्णालयात दाखल केल्याच्या घटना समाज माध्यमांवर गर्वाने व कौतुकाने सांगितल्या जातात. मग आमच्यावर हा अन्याय का, असा सवाल चालक उपस्थित करत आहेत.
एकूणच सेवेचा विचार करून एसटीच्या वाहनाला विशिष्ट परिस्थितीत वेग मर्यादेत शिथिलता देण्यात यावी. याबाबत आरटीओ व एसटीचे व्यवस्थापन यांच्यात चर्चा झाली पाहिजे. तसे निश्चित धोरण ठरविण्यात आले पाहिजे. एसटीकडून असा दंड वसूल करताना तिच्या सेवेचा व यापुढे चालकांच्या पगारातून अशी वसुली करताना त्यांच्याही आर्थिक स्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात आला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
श्रीरंग बरगे, सरचिटणीस,महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसघाट सेक्शनमध्ये चढावाला व उताराला एसटीच्या वाहनाची वेग मर्यादा कमी करण्याचा प्रयत्न केला तरी मागे व पुढे असलेल्या वाहनांमुळे ते कधी कधी शक्य होत नाही. अशावेळी रस्त्यावरची पुढची स्थिती बघून वाहन चालवावे लागते. त्यामुळे उतार व चढावाला एसटी हे शासकीय वाहन असल्याने त्याची वेग मर्यादा ताशी 40 किमीऐवजी किंचित वाढल्यास दंड वसूल करण्यात येऊ नये.