ST NCMC Card  
मुंबई

NCMC card deadline extended |एसटीच्या एनसीएमसी कार्डसाठी मुदतवाढ

एसटीच्या एनसीएमसी कार्डसाठी मुदतवाढ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

ग्रामीण भागातील अनेक महिला लाभार्थ्यांची कार्ड नोंदणी अद्याप अपूर्ण असल्यामुळे एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख कार्डांची नोंदणी व वितरण करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिला लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचली नसल्याने त्या अद्याप स्मार्ट कार्डपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने आता ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून ही शिबिरे राबविण्यात येणार आहेत. या विशेष मोहिमेद्वारे ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांची १०० टक्के एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने निश्चित केले आहे.

एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड नसतानाही ७ नोव्हेंबर २०२६ पासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत एसटीच्या प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे कार्ड नोंदणी अद्याप पूर्ण न झालेल्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT