Mrinal Tai Gore Flyover: मुंबईत नुकत्याच सुरू झालेल्या २४८ कोटी रुपयांच्या मृणालताई गोरे उड्डाणपुलावरून नवा वाद निर्माण झाला आहे. उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच पुलावरील रस्त्याच्या पृष्ठभागाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेक नागरिकांनी रस्त्यावर खड्डे आणि उखडलेल्या डांबरासारखे दिसणारे भाग दाखवत कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गोरेगाव परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. मात्र पुल सुरू होताच त्यावरील काही भागांमध्ये डांबराचे पॅचवर्क आणि खड्ड्यासारखी दिसणारी ठिकाणे नागरिकांच्या नजरेत भरली. त्यामुळे सोशल मीडियावर महापालिकेवर टीकेची झोड उठली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे राष्ट्रीय प्रवक्ते अनिश गवांडे यांनीही या मुद्द्यावरून मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधला. “७५० मीटर लांबीच्या या उड्डाणपुलासाठी २४८ कोटी रुपये खर्च झाले. म्हणजे प्रति मीटर सुमारे ३३ लाख रुपये खर्च झाले. तरीही उद्घाटनाच्या दिवशीच पुलावर खड्डे दिसत आहेत,” अशी टीका त्यांनी केली. सात वर्षे विलंब, वाढलेला खर्च आणि ठेकेदारावर दंडात्मक कारवाई झाल्यानंतरही अशी अवस्था का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
वाद वाढताच मुंबई महानगरपालिकेने याबाबत स्पष्टीकरण दिले. महापालिकेच्या म्हणण्यानुसार, पुलावरील जे सांधे किंवा पॅचवर्कसारखे भाग दिसत आहेत ते प्रत्यक्षात ‘मॅस्टिक ॲस्फाल्ट’ टाकण्याच्या तांत्रिक प्रक्रियेचा भाग आहेत. पुलाच्या संरचनेच्या सुरक्षिततेशी किंवा गुणवत्तेशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.
महापालिकेच्या निवेदनात म्हटले आहे की, नव्याने टाकलेल्या मॅस्टिक ॲस्फाल्टचा पृष्ठभाग सुरुवातीला तुलनेने गुळगुळीत असतो. वाहने घसरणार नाही असा पृष्ठभाग मिळावा यासाठी त्यावर दगडी पॅच लावले जातात. त्यामुळे सुरुवातीला रस्ता असमान किंवा पॅचवर्क केल्यासारखा दिसू शकतो. मात्र वाहतूक सुरू झाल्यानंतर हा पृष्ठभाग हळूहळू नीट होत जातो.
मात्र महापालिकेच्या या स्पष्टीकरणावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. अनिश गवांडे यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि मुंबईच्या महापौरांना पत्र लिहून पुलाच्या पृष्ठभागाच्या गुणवत्ता चाचणीचा अहवाल जाहीर करण्याची मागणी केली आहे. “२४८ कोटी रुपयांचा पूल अपूर्ण अवस्थेत सुरू करण्यात आला आणि आता नागरिकांच्या वाहनांनाच अंतिम काम पूर्ण करण्यासाठी वापरले जात आहे का?” असा सवाल त्यांनी केला.
या उड्डाणपुलाच्या कामाला गेल्या काही वर्षांत अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. प्रकल्पाचा खर्च तीन वेळा वाढवण्यात आला आणि विलंबामुळे ठेकेदारावर दररोज दंडही आकारण्यात आला होता. त्यामुळे उद्घाटनानंतर लगेचच निर्माण झालेला हा वाद आणखी चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, पुलाच्या प्रत्यक्ष गुणवत्तेबाबत आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्यांबाबत अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. मात्र उद्घाटनानंतर काही तासांतच मुंबईच्या नव्या उड्डाणपुलावरून निर्माण झालेल्या या वादामुळे महापालिका आणि प्रशासन पुन्हा एकदा टीकेच्या केंद्रस्थानी आले आहे.