मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) जुन्या कागदपत्रांची श्रेडिंग मशीनद्वारे कुटाई करून विल्हेवाट लावण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादानंतर आयोगाने अखेर माघार घेतली आहे. १४ ऑक्टोबरला प्रसिद्ध केलेली दरपत्रक सूचना आयोगाने तात्पुरती स्थगित केली आहे. चौकशी सुरू असताना कार्बनलेस उत्तरपत्रिका, अर्ज आणि अन्य जुनी कागदपत्रे नष्ट करण्यासाठी दरपत्रक मागविण्याच्या आयोगाच्या निर्णयावर दैनिक ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.
एमपीएससीच्या कथित पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि भरतीतील पारदर्शकतेच्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी सलग ११ दिवस आंदोलन केले. या आंदोलनानंतर राज्य सरकारने माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली असून, आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची समितीच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे.
चौकशी पूर्ण होईपर्यंत आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना रजेवर पाठविण्यात आले असून, सरकारच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले. मात्र, चौकशीचे हे प्रकरण सुरू असतानाच आयोगाने जुन्या उत्तरपत्रिका, उत्तरपुस्तिका, अर्ज आणि अन्य कागदपत्रांची श्रेडिंग मशीनद्वारे कुटाई करून विल्हेवाट लावण्यासाठी दरपत्रक मागविल्याने नव्या वादाला तोंड फुटले. चौकशी सुरू असताना कागदपत्रे नष्ट करण्याची घाई कशासाठी, असा सवाल उपस्थित झाल्यानंतर ‘पुढारी’ने हा मुद्दा लावून धरला.
या प्रक्रियेमुळे चौकशीसाठी आवश्यक ठरू शकणारे अभिलेख सुरक्षित राहणार का, असा गंभीर मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनीही आयोगाच्या निर्णयावर सवाल उपस्थित करत चौकशी पूर्ण होईपर्यंत कागदपत्रे नष्ट करण्याची प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर आयोगाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्धिपत्रक जारी करून प्रक्रिया तात्पुरती स्थगित केल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे रद्दी विल्हेवाटीच्या निर्णयावरून आयोगाला माघार घ्यावी लागली आहे.
आता प्रक्रिया स्थगित झाली असली, तरी ती कायमस्वरूपी रद्द होणार का, कागदपत्रांची स्वतंत्र तपासणी केली जाणार का आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व संबंधित अभिलेख सुरक्षित ठेवले जाणार का, याबाबत आयोगाने स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक आहे, अशी भूमिकाही विरोधी पक्षाने घेतली आहे.
काय घेतला होता निर्णय...
आयोगाने कार्बनलेस उत्तरपत्रिका व उत्तरपुस्तिका, अर्ज, वर्तमानपत्रे, मासिके, जुनी कागदपत्रे आणि अन्य साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी दरपत्रक मागविले होते. विशेष म्हणजे, कागदपत्रांची केवळ विक्री नव्हे, तर श्रेडिंग मशीनद्वारे कुटाई करून ती नष्ट करण्याची प्रक्रिया प्रस्तावित होती. यासाठी बुधवारी निविदा जाहिरात काढली होती. त्यामुळे कोणत्या कालावधीतील कागदपत्रे नष्ट केली जाणार, त्यांची छाननी झाली आहे का आणि चौकशीशी संबंधित अभिलेख सुरक्षित ठेवले आहेत का, असे प्रश्न उपस्थित झाले होते.