MPSC Main Exam 2024 Date
मुंबईः राज्य लोकसेवा आयोगाने २७ ते २९ मे दरम्यान परिक्षा होणार असल्याचे पत्रक काढले आहे. पण सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस मुसळधार पावसाचाच इशारा दिला आहे. अशातच राज्य लोकसेवा आयोगाने या परिक्षा होणारच असे पत्रक काढले आहे. त्यामुळे परिक्षार्थींपुढे पेच निर्माण झाला आहे. या पत्रकावरुन समाजमाध्यमांवर संतापजनक सवाल उपस्थित होत आहेत. परिक्षेला कसे पोहत पोहत जायचे का असे प्रश्न विचारले जात आहेत.
पावसामुळे अनेक रस्ते वाहून गेले आहेत.वाहतूकीची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. हाय-वे ब्लॉक होत आहेत. मुंबईची तुंबापूरी झाली आहे. अनेक रस्ते ब्लॉक असून, लोकल सेवाही विस्कळीत आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षेला वेळेत कसे पोहचणार हा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे आहे. संबध महाराष्ट्रात हा पावसाचे थैमान सुरु आहे.
आयोगाने नेमके काय म्हटले आहे?
सोमवारी दुपारी आयोगाने अधिकृत X अकाऊंटवरून (पूर्वीचे ट्विटर) पत्रक शेअर केले आहे. ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २७ ते २९ मे, २०२५ या कालावधीमध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ राज्यातील एकूण ६ जिल्हाकेंद्रावर घेण्यात येणार आहे. प्रस्तुत परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन उमेदवारांनी परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे’, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
तसेच परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाहो अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. उमेदवारांनी उपरोक्त बाबी विचारात घेऊन विहित वेळेमध्ये परीक्षेस उपस्थित राहण्याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहनही आयोगाने केले आहे.
आयोगाला परिक्षार्थींची काळजी नाही का ?
दरम्यान राज्यशासनाने मुसळधार पावसामुळे मुंबई - मुबई उपनगर परिसरात रेड अलर्ट जारी केला आहे. आज सोमवारी शासकीय कर्मचाऱ्यसांना लवकर घरी जाता यावे यासाठी दुपारी चार वाजता घरी जाण्याची परवानगीही दिली आहे. त्यामुळे शासनाचा सामान्य प्रशासन विभाग कर्मचाऱ्यांची काळजी करतो तर शासनाच्या राज्य लोकसेवा आयोगाला विद्यार्थ्यांची काळजी नाही का असा प्रश्न पडतो आहे.
मुख्यंमंत्र्यांच्या पोस्टला टॅग करत परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स पोस्टवरुन पावसासंबधी माहिती दिली आहे. राज्यात कुठे कसा पाऊस पडतो आहे, नुसानीची माहिती दिली आहे. याच पोस्ट ला टॅग करत ‘देवा जाधव’ या युजरने एमपीएसीची परिक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली आहे. उद्यापासून रेड अलर्ट जारी केला आहे. तर राज्यसेवेची परिक्षा पुढील २ दिवसांत ३ सत्रांमध्ये होणार आहे. विद्यार्थ्यांनी पोहत पोहत परिक्षा केंद्रावर जायचे का असा सवालही केला आहे. तर ही व्यवस्था निर्दयी आहे, एमपीएससी विद्यार्थ्यांचाही विचार करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.