राज्यातील शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहे. मुंबईत हिंदी सक्ती विराेधात निघणार्या मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार खासदार संजय राऊत यांनी आज (दि. २९) माध्यमांशी बोलताना दिली. तसेच आंदोलनासाठी राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येणे राजकीय युती नाही का?, असा सूचक सवालही त्यांनी यावेळी केला.
राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आंदोलन करतील. हिंदीची सक्तीबाबत प्रसिद्ध झालेला सरकारी निर्णयाची आम्ही जनतेसोबत हाेळी करु. या आंदोलनाचा मुख्य कार्यक्रम मुंबईत आयोजित केला जाईल आणि या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
या आंदोलनानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात होत असलेल्या एकीबद्दल बोलताना "एका आंदोलनासाठी राज आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे, ही राजकीय युती नाही का?" असा सूचक सवालही संजय राऊत यांनी यावेळी केला.
ठाकरे बंधू भेटीच्या क्षणासाठी शिवसैनिक व मनसैनिक आतुरला आहे. मुंबई ठाकरेंचीच..हे दाखवण्यासाठी 5 जुलैला होणारा मोर्चा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी दोन्ही सैनिकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.या मोर्चासाठी मुंबई शहर व उपनगरातील एका प्रभागातून किमान एक ते दीड हजार अशा 227 प्रभागातून अडीच ते साडेतीन लाख सर्वसामान्य मराठी माणूस सहभागी करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठी माणूस मुंबईत दाखल होणार आहे. हिंदी भाषासक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे व राज ठाकरे गेल्या 14 वर्षांनंतर एकत्र येत आहेत. त्यामुळे शिवसैनिक व मनसैनिकांमध्ये उत्साह दिसत आहे.या मोर्चात जास्तीत जास्त मराठी माणूस सहभागी व्हावा यासाठी सोशल मीडियासह प्रभागातील चौक, प्रमुख स्थळे, रेल्वे स्टेशन परिसर येथे जाहिरातबाजी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे मनसे व शिवसेनेचे पदाधिकारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप या माध्यमातून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. विशेष म्हणजे ही पोस्ट करत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव व राज यांचे फोटो छापले जात आहेत.