MHADA  
मुंबई

Motilal Nagar Redevelopment-मोतीलाल नगरच्या तिन्ही रहिवासी समित्यांचा म्हाडाला पाठिंबा

पुनर्विकासाला गती द्या; पत्रकार परिषदेत मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गोरेगाव मोतीलाल नगर क्रमांक १, २ व ३ या म्हाडा वसाहतींचा पुनर्विकासाला आणखी विलंब न करता तो तातडीने सुरु करुन त्याला गती द्यावी व रहिवाशांना लवकर घरे मिळावीत, अशी मागणी मोतीलाल नगर जन कल्याणकारी समिती, मोतीलाल नगर रहिवाशी विकास संघ व मोतीलाल नगर पुनर्विकास समन्वय समितीने केली. या तिन्ही समित्यांनी पुनर्विकासासाठी म्हाडाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.

मुंबई मराठी पत्रकार संघात या तीनही समित्यांची संयुक्त पत्रकार परिषद बुधवारी झाली. यावेळी मोतीलाल नगर जन कल्याणकारी समिती अध्यक्षा माधवी राणे, सेक्रेटरी गौरव राणे व पुनर्विकास समन्वय समिती सरचिटणीस संतोष परब यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

गौरव राणे म्हणाले, मोतीलालनगर मधील ही वसाहत १९६१ ची आहे. ती जुनी झाली आहे. म्हाडा या इमारतीचा पुनर्विकास करणार असून अदानी समूहाला प्रकल्पाचे विकासक म्हणून नेमले आहे. १४३ एकर वसाहतीची जागा आहे. सुमारे ३७०२ घराचा या पुनर्विकास प्रकल्पात समावेश आहे. ५० मजली इमारत होणार असणार असून त्यासाठी सुमारे ३६ हजार कोटी खर्च आहे. म्हाडा या प्रकल्पाची देखरेख करणार आहे. १६०० चौरस फूट बिल्ट-अप क्षेत्राचे १६०० चौरस फूट कार्पेट क्षेत्रामध्ये रूपांतर करण्यास मान्यता मिळाली आहे. याचा लाभ सर्व पात्र रहिवाशांना होणार आहे. कोणत्याही अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या प्रचारावर विश्वास ठेवू नये. केवळ म्हाडा, शासन आणि समित्यांकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीला महत्त्व द्यावे.

सरकार व म्हाडा प्रशासनाला तिन्ही समित्या सहकार्य करीत आहेत. मात्र काही जण खोडसाळपणे हेतूपुरस्पर हा प्रकल्प रोखण्याचे काम करीत आहेत. सरकारने त्यांच्याकडे लक्ष द्यावे, अशीही मागणी गौरव राणे यांनी केली.

अफवांना बळी पडू नका

माधवी राणे म्हणाल्या, मोतीलाल नगरमधील हजारो कुटुंबे अनेक दशकांपासून जुन्या, जीर्ण व धोकादायक इमारतींमध्ये राहत आहेत. अपुऱ्या पायाभूत सुविधा, अरुंद जागा, वाहतूक कोंडी, अस्वच्छ परिसर व सुरक्षेच्या विविध समस्यांमुळे रहिवाशांचे दैनंदिन जीवन कठिण झाले आहे. त्यामुळे लवकर घरे त्यांना मिळावीत. संतोष परब म्हणाले, २०१३ पासून या प्रकल्पासाठी समिती लढा देत आहे. पावसाळ्यात वसाहतीच्या आवारात पाणी भरते व रोगराई पसरते. त्याचा रहिवाशांवर परिणाम होत आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकर होणे गरजेचे आहे. रहिवाश्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT