मुंबई : मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामध्ये दोन ते अडीच हजारापेक्षा जास्त झाडे व झाडाच्या फांद्या पडल्या. त्यानंतर झाड पडण्याचे सत्र थांबेल असे वाटत होते. पण पाऊस व वारा थांबल्यानंतरही झाडे पडणे सुरूच राहिले. गेल्या सात दिवसात तब्बल २०० पेक्षा जास्त झाडे व फांद्या पडल्या.
यंदाच्या पावसाळ्यात झाडे व झाडाच्या फांद्या पडण्यावरून मुंबई महानगरपालिका प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे. त्यात चेंबूर येथे स्कूल बसवर झाड पडून झालेल्या जीवघेण्या घटनेनंतर महापालिका अजूनच अडचणीत आली आहे. मागील दहा वर्षाच्या तुलनेत यंदा झाडे व फांद्या पडण्याच्या संख्येमध्ये दुप्पट वाढ झाली आहे.
मागील दहा वर्षाची तुलना केल्यास पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरी दोन ते अडीच हजार झाडे व फांद्या पडत होत्या. परंतु यंदा आठवड्याभरात दोन ते अडीच हजार झाडे पडून तिघांचा मृत्यू तर सुमारे २० पेक्षा जास्त जखमी झाले. पाऊस व वारा थांबल्यामुळे झाडे पडणे थांबेल असे वाटत होते. परंतु रोज ३० ते ३५ झाडे व फांद्या पडत आहेत.
शहर उपनगरात आतापर्यंत पडलेल्या झाडांपैकी सर्वाधिक झाडे रस्त्याच्या कडेला होती. विशेष म्हणजे ही सर्व झाडे १० ते १५ वर्षापेक्षा जुनी होती. पण यातील बहुतांश झाडांना कीड लागल्यामुळे ती आतून पोखरली गेली आहे. परंतु याबाबत पालिकेच्या उद्यान विभागाकडे अशा पोखरलेल्या झाडांची माहितीच नाही. त्यामुळे वरून चांगले दिसणारे झाड कधी पडेल हे सांगता येत नाही.
दरम्यान पावसाला उघडीप मिळाल्यामुळे सध्या मुंबईतील झाडांचा सर्वे सुरू असून धोकादायक फांद्या कापण्यात येत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात झाडे व फांद्या पडण्याची संख्या कमी होईल, असा विश्वास उद्यान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पडलेल्या झाडांच्या ठिकाणी पुन्हा झाडे लावणार
मुंबई शहर व उपनगरात पावसाळ्यात पडलेल्या झाडांच्या ठिकाणी पुन्हा झाडे लावण्यात येणार आहेत. या झाडांमध्ये देशी प्रजाती झाडांचा समावेश असणार आहे. यात पळस, बेहेडा, शिशम, आपटा, चंदन, कण्हेर, हिरडा, सागरगोटा, कवठ, भोकर, शमी, वड आदी झाडांचा समावेश आहे. पावसाळ्यातच ही झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
७ दिवसात पडलेली झाडे व फांद्या
०९ जुलै -१२६
१० जुलै -३४
११ जुलै -११
१२ जुलै -२०
१३ जुलै -१८
१४ जुलै -१५
१५ जुलै -१०