मुंबई : मतदार याद्यांमधील घोळ आणि मतचोरीचा निषेध करण्यासाठी शिवसेना उबाठा, मनसे यांच्यासह महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष शनिवारी, १ नोव्हेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चा काढणार आहेत. सर्व विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या मोर्चाचे नेतृत्व करणार असून राज्यभरातील लाखो नागरिक या मोर्चात सहभागी होणार आहेत. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या मोर्चाला परवानगी देण्यात आली नव्हती.
दरम्यान, ज्यांना आपले मत चोरीला गेले असे वाटत आहे आणि ज्या चुकीच्या मतांवर हे सरकार बसले असे वाटते, त्यांनीही या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आले आहे. या मोर्चाला 'सत्याचा मोर्चा' असे नाव देण्यात आले असून, शनिवारी दुपारी १ वाजता चर्चगेट येथील फॅशन स्ट्रीट येथून या मोर्चाला सुरुवात होईल. मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर मोर्चाची सांगता होणार आहे.
मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते, शेकापचे जयंत पाटील, तसेच डाव्या पक्षांचे नेते आदी या मोर्चात सहभागी होणार आहेत. मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी हा मोर्चा दुपारी १ ते ४ या वेळेत ठेवला आहे. आंदोलनाची पुढील दिशा काय असेल याची घोषणा यावेळी होणाऱ्या सभेतच केली जाणार आहे.
परवानगी आवश्यक
मिळालेल्या माहितीनुसार, आझाद मैदानाच्या बाहेर मोर्चा काढण्यास नियमांनुसार परवानगी देता येत नाही. आझाद मैदानाच्या आत आंदोलन करता येईल, परंतु बाहेरून मोर्चा निघाल्यास तो विनापरवाना ठरेल.