

नागपूर - शहराच्या स्थानिक राजकारणात आज महत्त्वपूर्ण राजकीय उलथापालथ झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नागपूर 'दक्षिण' विधानसभा मतदारसंघाचे सक्रीय पदाधिकारी, उपजिल्हाप्रमुख मुकेश रेवतकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे नागपूर 'दक्षिण' भागातील शिवसेनेच्या संघटनेला मोठा धक्का बसला असून, त्यांच्यासोबत शेकडो निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील राष्ट्रवादीत दाखल झाले.
हा पक्षप्रवेश सोहळा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भंडारा येथील जिल्हा कार्यालयात पार पडला. पक्षाचे निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच शहराध्यक्ष अनिल अहिरकर, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, माजी मंत्री नानाभाऊ पंचबुद्धे, भंडारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, महासचिव धनंजय दलाल तसेच चंद्रकांत नायक, लक्ष्मण बालपंडे, ईश्वर कोल्हे आदी महत्त्वाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. रेवतकर यांनी शिवसेनेमध्ये अनेक वर्षे संघटनात्मक जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली असून, हा पक्षप्रवेश नागपूर 'दक्षिण' मधील राजकीय गणिते बदलणारा आणि शिवसेनेच्या मूळ गटाला मोठा संघटनात्मक धक्का देणारा म्हणता येईल.