मुंबई: रस्ते, पदपथ व इमारत परिसरात परवानगीशिवाय पांढरे पट्टे ओढून विद्रुपीकरण करणार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. गिरगाव परिसरातील महापालिका कार्यालये व पोलीस ठाण्यांना तसे पत्र दिले आहे.
गिरगाव, ग्रँट रोड, ताडदेव या परिसरात जैन समाजाकडून मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मलबार हिल विभाग अध्यक्ष दिनेश पुंडे यांनी पांढऱ्या पट्ट्या मारणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि समाजात धार्मिक तेढ वाढविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
शनिवारी गिरगाव चौपाटीजवळच्या बेने हॉटेलसमोरच्या पदपथावर आणि मंगलवाडी परिसरातील मोकळ्या रस्त्यावर काही व्यक्तींनी पांढरे पट्टे मारून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
याला गिरगावकर मंडळींनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मिळून जोरदार विरोध केल्यानंतर स्थानिक महापालिका कार्यालय आणि पोलिसांनी मिळून लागलीच पांढऱ्या पट्ट्यांवर दुसरे कलर मारून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता.
सदर प्रकरण शांत होत नाही तोच गिरगावत आणखी काही इमारती, चाळी पदपथांवर जाणूनबुजून पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्थानिक महापालिका कार्यालय आणि सर्व गिरगावसह संपूर्ण परिसरातील पोलीस ठाण्यांना पत्र देऊन रस्ते, पदपथांवर जाणून-बुजून पांढऱ्या पट्ट्या ओढणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावर पालिका पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.