MMRDA Mumbai Projects File Photo
मुंबई

MMRDA Mumbai Projects: लवकरच महामुंबईतील प्रवास ५९ मिनिटांत; एमएमआरडीएचे सर्व प्रकल्प २०२८पर्यंत पूर्ण होणार

महामुंबईतील सर्व प्रमुख कनेक्टिव्हिटी प्रकल्प डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट; पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण प्रवासाला मिळणार वेग

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) महामुंबईत सध्या सुरू असलेले सर्व प्रकल्प डिसेंबर २०२९ या नियोजित मुदतीच्या आधीच डिसेंबर २०२८मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले. यामुळे संपूर्ण महामुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी केवळ ५९ मिनिटांचा कालावधी लागणार आहे.

'नरेडको महाराष्ट्र'द्वारे आयोजित रियल इस्टेट अँड इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टर्स समिट २०२६च्या सहाव्या आवृत्तीत 'मुंबई ३.० च्या निमित्ताने उपलब्ध संधी' या सत्रात डॉ. मुखर्जी यांना निमंत्रित करण्यात आले होते.

मुंबईकडे वित्तपुरवठा आहे, सर्वोत्तम मनुष्यबळ आहे, पण सर्वात कमी काय असेल तर ते म्हणजे वेळ. ‘५९ मिनिटांत मुंबई’ या संकल्पनेचा मूळ उद्देश मुंबईकरांना त्यांचा मौल्यवान वेळ परत मिळवून देणे हा आहे.

आमचे उद्दिष्ट पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण जोडणी अशा प्रकारे निर्माण करणे आहे, ज्यामुळे लोक संपूर्ण प्रदेशात अधिक वेगाने, कार्यक्षमतेने आणि वेळेचे अचूक नियोजन करून प्रवास करू शकतील. वाहतूक व्यवस्थेतील हा बदल लवकरच दिसून येईल आणि ५९ मिनिटांत मुंबई लवकरच प्रत्यक्षात येईल, असा विश्वास मुखर्जी यांनी व्यक्त केला.

रस्ते जोडणी कार्यक्रम हा सुमारे १० प्रमुख लिंक-रोड आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे एक एकात्मिक जाळे म्हणून विकसित केला जात आहे. यामुळे विस्तृत महानगर प्रदेशात पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण वाहतूक अधिक वेगाने होईल.

नरिमन पॉइंट आणि कफ परेडपासून पूर्वमुक्त मार्ग आणि एमटीएचएलपर्यंत वाहतूक सुलभ होईल. तसेच एससीएलआर, वरळी कनेक्टिव्हिटी, जेव्हीएलआर आणि इतर ठिकाणी विविध रस्ते जोडले जाणार आहेत.

वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू आणि त्यानंतर दहिसर, बाळकुम आणि पूर्वमुक्त मार्गाच्या दिशेने होणारी वाहतूक पश्चिम आणि पूर्व उपनगरांसाठी उपयुक्त आहे. मुंबईच्या विस्तारणाऱ्या रस्ते जाळ्यातील आणखी एक महत्त्वाचा भाग असलेल्या एससीएलआरचे कामही सुरू झाले आहे, अशी माहिती डॉ. मुखर्जी यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT