Mumbai Metro Pudhari File Photo
मुंबई

Metro 9 Mumbai: मेट्रो 9 मार्गावर 7 नवीन पादचारी पूल उभारणार

मिरा-भाईंदरकरांना सुरक्षित, सुलभ प्रवासाचा लाभ

पुढारी वृत्तसेवा

राजू काळे

भाईंदर: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मेट्रो 9 (दहिसर पूर्व ते मिरा-भाईंदर) मार्गावरील प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित, सुलभ व सोयीस्कर प्रवास व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलून मेट्रो 9 मार्गावर 7 नवीन पादचारी पूल उभारण्याचे जाहीर केले आहे.

या पुलांमूळे प्रवाशांना मल्टी-मोडल इंटिग्रेशनद्वारे मेट्रो स्थानकांपर्यंत सहज कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार असल्याचा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे.

दहिसर पूर्व ते मिरा-भाईंदर पर्यंतच्या सुमारे 11 किलोमीटर लांबीच्या व 8 मेट्रो स्थानकांच्या या मार्गावर तब्बल 7 पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. हे पूल एमएमआरडीएच्या मल्टी-मॉडेल इंटिग्रेशन (एमएमआय) उपक्रमाचा भाग असून मेट्रो स्थानकांपर्यंत सुरक्षित व अखंड जोडणी उपलब्ध करून देण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तर उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे व राज्याचे मुख्य सचिव तथा एमएमआरडीएच्या 286 व्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आि एमएमआरडीए महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या नियंत्रणाखाली या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली.

मेट्रो 2अ आणि 7 मार्गांवर यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या मल्टी-मॉडेल इंटिग्रेशन उपक्रमाच्या धर्तीवर मेट्रो 9 मार्गासाठी सुद्धा हि सुविधा विकसित करण्यात येणार आहे. यामुळे विविध सार्वजनिक वाहतूक साधनांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधला जाणार असून या पादचारी पुलांमूळे प्रवाशांना मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि मिरा-भाईंदर शहर हे मुंबई महानगर प्रदेशातील अत्यंत वर्दळीचे मार्ग आहेत. 30 ते 60 मीटर रुंदीचे हे रस्ते आणि त्यावरील मोठ्या प्रमाणातील वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हे पूल उभारण्यात येणार आहेत.

हे पादचारी पूल दहिसर टोलनाका येथे 145 मीटर लांब, मिरागाव येथे 87 मीटर लांब, मीरारोड येथील काशीगाव येथे 92 मीटर लांब, साईबाबा नगर येथे 80 मीटर लांब, शिवार गार्डन येथे 80 मीटर लांब, भाईंदर पश्चिमेकडील मॅक्सस मॉल येथे 83 मीटर लांब व वेज सागर हॉटेल येथे 88 मीटर लांब पर्यंत बांधण्यात येणार आहेत.

या सर्व पुलांची रुंदी 3 मीटर पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि सोयी लक्षात घेऊन सर्व पादचारी पुलांमध्ये जिने, दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक व सर्वसामान्य प्रवाशांसाठी लिफ्ट, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहेत. या पादचारी पुलांमुळे प्रवाशांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडणे शक्य होणार असून अपघातांचा धोका कमी होणार आहे. पादचारी पुलांद्वारे प्रवाशांना मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.

मुंबईतील मेट्रो जाळ्याचा विस्तार जितका महत्त्वाचा आहे तितकेच प्रवाशांना या सेवांपर्यंत सुरक्षित व सुलभ पोहोचता येणेही महत्त्वाचे आहे. मल्टी-मॉडेल इंटिग्रेशनच्या माध्यमातून नागरीकांना त्यांच्या घरांपासून तसेच कार्यस्थळांपासून मेट्रो स्थानकांशी प्रभावी जोडणी मिळत आहे. महाराष्ट्रात दरवर्षी जवळपास 50 किलोमीटर नवीन मेट्रो मार्ग जोडले जात आहेत. सरकारचे ध्येय केवळ मेट्रो मार्ग उभारणे नसून प्रवाशांसाठी अखंड, सोयीस्कर व आधुनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे हे आहे. मेट्रो 9 मार्गावरील निर्माणाधीन पादचारी पूल त्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे यश केवळ त्या प्रकल्पावर अवलंबून नसून नागरीकांना ती सेवा किती सहज व सुरक्षितपणे वापरता येते, यावरही अवलंबून असते. मेट्रो 9 मार्गावरील हे पादचारी पूल सुरक्षितता, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा सुविधा सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविण्यासह त्या अधिक सक्षम करुन मुंबई महानगर प्रदेश घडविण्यास मदत करतील.
- उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे
आधुनिक शहरी वाहतूक व्यवस्थेमध्ये मल्टी-मॉडेल इंटिग्रेशन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मेट्रो 9 मार्गावरील प्रस्तावित पादचारी पूल नागरीकांच्या सुरक्षित हालचाली, स्थानकांपर्यंत सुलभ पोहोच आणि प्रवाशांच्या सुरळीत व्यवस्थापनासाठी नियोजनपूर्वक विकसित करण्यात येणार आहेत. या सुविधांमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, सोयीस्कर व अखंड प्रवासाचा अनुभव मिळेल. तसेच मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल.
- एमएमआरडीए महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT