मुंबई: एमएमआरडीएने महालक्ष्मी मल्टिमॉडल कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण केले आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाअंतर्गत एकही झाड न तोडता देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त पादचारी पूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक, मेट्रो मार्गिका ३ आणि महालक्ष्मी उपनगरीय रेल्वे स्थानक यांना अखंड जोडणी मिळणार आहे.
हा एकात्मिक इंटरचेंज मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर स्थानकांदरम्यान बदलण्यासाठी लागणारा वेळ सुमारे २० मिनिटांनी कमी होईल. तसेच दक्षिण मुंबई आणि वरळी परिसरातून मुंबई मोनोरेलपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल. अखंड मल्टिमॉडल जोडणीमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या वापरालाही मोठी चालना मिळणे अपेक्षित आहे.
सुमारे २८३ मीटर लांबीचा हा एकात्मिक पादचारी पूल असून प्रवाशांच्या सुरळीत हालचालीसाठी ११ मीटर रुंद संरचना करण्यात आली आहे. एकूण १७६ मीटर लांबीचे सहा ट्रॅव्हलेटर्स यावर लावण्यात आले आहेत. दोन उद्वाहकही लावण्यात आले आहेत. प्रतितास सुमारे ४ हजार ५०० प्रवासी या पुलावरून प्रवास करू शकतात.
या प्रकल्पाच्या पायाभरणीपूर्वी १,८०० मिमी व्यासाची पावसाच्या पाण्याची वाहिनी सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आली. तसेच लगतच्या जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्यांना कोणताही धक्का न लावता संपूर्ण काम पूर्ण करण्यात आले, त्यामुळे बांधकामाच्या कालावधीत नागरी सेवा अखंड सुरू राहिल्या.