MMR Dangerous Buildings Pudhari
मुंबई

MMR Dangerous Buildings: ‘एमएमआर’मधील ७,८४० इमारती धोकादायक; ७६५ इमारती अतिधोकादायक

तब्‍बल ७६५ अतिधोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: भिवंडी येथील कोहिनूर अपार्टमेंट इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) परिसरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने केलेल्या पाहणीनुसार, एमएमआरमधील आठ महापालिका हद्दींमध्ये एकूण ७,८४० धोकादायक इमारती आढळून आल्या असून, त्यापैकी ७६५ इमारती अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि पनवेल महापालिका क्षेत्रातील या इमारतींची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई शहरातही १७४ अतिधोकादायक इमारती असल्याची माहिती समोर आली आहे.

या धोकादायक इमारतींमध्ये अद्यापही हजारो कुटुंबे वास्तव्यास असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा इमारती कोसळण्याचा धोका वाढला असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

प्रशासनाने सर्वाधिक धोकादायक इमारती त्वरित रिकाम्या करून आवश्यकतेनुसार त्या पाडण्याचे निर्देश दिले आहेत. कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आदेश न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

दरम्यान, धोकादायक इमारती रिकाम्या करण्याच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या रहिवाशांवर कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. आवश्यकतेनुसार पोलिसांच्या मदतीने इमारती रिकाम्या करण्याची मोहीम राबविण्यात येणार असून नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT