Manikrao Kokate Video
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळ सभागृहातच मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हा व्हिडिओ X वर पोस्ट केला होता. एकीकडे राज्यातील शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न असताना, दुसरीकडे राज्याचे कृषीमंत्री सभागृहातच मोबाईलवर रमी खेळत असल्याचे व्हिडिओत दिसून आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. 'मी रमी खेळलो नाही. मी जर दोषी आढळलो तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.
युट्यूबवर रमीची आलेली जाहीरात स्कीप करताना व्हिडिओ बनवला. जाहीरात स्कीप करायला ३० सेकंद लागतात. माझा हा १८ सेकंदाचा व्हिडिओ बनवला. पूर्ण व्हिडिओ दाखवला असता तर खरं काय कळलं असतं, असा दावा कोकाटे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्याला उत्तर म्हणून आमदार रोहित पवार यांनी X वर आज आणखी दोन व्हिडिओ पोस्ट केले आहेत. यातील एक व्हिडिओ २४ सेकंदाचा आणि दुसरा १९ सेकंदाचा आहे.
''सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा… आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं. पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती,'' असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता?, असे सवाल उपस्थित केले आहेत.