मालाड: मढ बेट परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे झाल्याचे समोर आले आहे. यावर कठोर पावले उचलत बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सध्या त्या अतिक्रमणांवर कारवाई करत आहे. या कारवाईच्या यादीत आता बॉलीवूड अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांचं नावही समाविष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे.
महानगरपालिकेने मढमधील एरंगल गावातील एका भूखंडावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बंगल्यासंदर्भात मिथुन यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये त्यांना विचारण्यात आले आहे की, संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याने ते जमीनदोस्त का करू नये? यावर स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे.
जर मिथुन चक्रवर्ती यांनी पालिकेला समाधानकारक उत्तर दिलं नाही, तर पालिकेकडून त्यांच्या बंगल्यावर थेट तोडक कारवाई करण्यात येणार आहे. इतकंच नाही, तर भावी कायदेशीर कारवाईचाही इशारा पालिकेने दिला आहे.
महानगरपालिकेच्या मते, मढ परिसरात १०० हून अधिक बेकायदेशीर बांधकामे ओळखली गेली असून, त्यातील अनेक बांधकामे बनावट लेआउट प्लॅनच्या आधारावर उभारलेली आहेत. ही बांधकामे मे महिन्याच्या अखेरीस पाडण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
या कारवाईनंतर परिसरातील अन्य भूखंडधारक व रहिवासी यांनाही पालिकेच्या भूमिकेबाबत सतर्क व्हावं लागतंय. मोठ्या बंगल्यांसह अनेक लहान-मोठ्या अनधिकृत झोपडपट्ट्यांवरही लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे.