Mithi River Dharavi New Bridge
मुंबई : धारावी येथील ड्राइव्ह इन थिएटरजवळ अर्थात मिठी नदीवरील जुना पूल पाडून महापालिका नवीन पूल उभारणार आहे. या पुलाच्या कामासाठी पालिकेने कंत्राटदाराची निवड केली. सदर पुलाच्या कामासाठी सुमारे ३०३ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. या नवीन पुलामुळे परिसरातील वाहतूक कोंडी दूर होईल.
मिठी नदीवरील पुलासाठी मुंबई महापालिकेने विस्तृत आराखडा तयार केला आहे. जुलै २००५ साली आलेल्या अतिवृष्टीनंतर तथ्य शोधन समितीची स्थापना डॉ. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती. या समितीने त्यावेळी मिठी नदीचे पात्र ६८ मीटरवरून १०० मीटरपर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती.
या शिफारशीनुसार, शीव-धारावी आणि पश्चिम उपनगरातील वांद्रे यांना जोडणाऱ्या पुलाची पुनर्बाधणी केली जाणार आहे. तसेच रूंदीही वाढवण्यात येणार आहे. ही कामे दोन टप्प्यांत पार पडणार आहेत. वांद्रे पूर्व येथील ड्राइव्ह इन थिएटरजवळून मिठी नदी वाहते. या नदीवरील पुलावरून वाहतूक होते, मात्र वाहनांची प्रचंड गर्दी होते. यामुळे पुलाची रूंदी आणि उंची वाढवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
दोन वर्षांत काम पूर्ण करणार
सध्या जुन्या पुलाची रूंदी ९. ३ मीटर आहे. तर, लांबी १०८ आहे. नवीन पुलाच्या कामानंतर रूंदी ४८ मीटर होईल.
या पुलामुळे बीकेसी, शीव अशा ठिकाणी जाणाऱ्या वाहनांचा प्रवास अधिक सुरळीत आणि सोपा होईल. नव्या पुलाच्या कामासाठी कंत्राटदार निवडण्यात आला आहे.
पुलाच्या पुनर्बाधणी करण्यासाठी ३०३ कोटी ९५ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. हा नवीन पूल २ वर्षांत उभारण्याचे उद्दीष्ट आहे.