मुंबई: जूनचा पंधरवडा संपला तरी मिठी नदीची साफसफाई अजून सुरूच आहे. आतापर्यंत ८८ टक्के गाळ उपसण्यात आला. त्यामुळे १०० टक्के सफाईचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी किमान आठवडाभराचा वेळ लागणार असल्याचे पर्जन्य जलवाहिनी विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
कुर्ला भागासह बांद्रा परिसरात पावसाळ्यात येणाऱ्या महापुराला मोठी नदी कारणीभूत असते. २६ जुलै २००५ अरे याच नदीने अनेकांचे संसारच उध्वस्त केले नाही तर काहींचे जीवही घेतले. त्यामुळे मिठी नदीच्या सफाईला प्राधान्य देण्यात येते. या नदीतील गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न असतात.
३१ मेपूर्वी नदीतील गाळ उपसण्याचे काम पूर्ण होणे आवश्यक असते. पण यावेळी अजूनही सफाईचे काम सुरू आहे. केवळ मान्सून लांबणीवर पडल्यामुळे या नदीतील सफाई करणे शक्य झाले. अन्यथा कुर्ला व बांद्रा भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असती.
यावेळी नदीतून १ लाख ३२ हजार मेट्रिक टन गाळ उपसण्याचे टार्गेट ठेवण्यात आले होते. मात्र आतापर्यंत १ लाख १६ हजार मेट्रिक टन गाळ उपसण्यात आला. उर्वरित गाळ काढण्यासाठी किमान आठवडाभराचा वेळ लागणार आहे. या काळात पाऊस लागला नाही म्हणजे मिळवले.
नालेसफाईचे टार्गेट मात्र पूर्ण करण्यात आले असून आता नाल्यांमधून अतिरिक्त गाळ काढला जात आहे. यावेळी नाल्यातून ६ लाख ३३ हजार मेट्रिक टन गाळ उपसण्याचे टार्गेट ठेवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ९ लाख २१ हजार मेट्रिक टन गाळ उपसण्यात आला.
तर पाऊस पडेपर्यंत अजून गाळ उपसण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. दरम्यान विरोधी पक्षाकडून नालेसफाई अपूर्ण असल्याचा दावा करण्यात येत असताना महापालिका प्रशासनाने मात्र गाळ उपसण्याचे ठरलेले टार्गेट पूर्ण करण्यात आले असल्याचे सांगितले.