Mithai Price Hike Pudhari
मुंबई

Mithai Price Hike: सण-उत्सवांच्या काळात मिठाईचा गोडवा झाला कडू; महागाईमुळे दरात वाढ

सणासुदीच्या काळात मिठाईच्या दरात मोठी वाढ झाली आहे. साखर, दूध आणि खव्याच्या किमती वाढल्याने मिठाई १५ ते २० टक्क्यांनी महागली असून गणेशोत्सवातील प्रसादावरही परिणाम होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: श्रावणापासून दिवाळीपर्यंतचा काळ हा विविध सण-उत्सवांचा काळ म्हणून ओळखला जातो. मात्र, यंदा वाढत्या महागाईने उत्सवातील गोडवा काहीसा कडू केला आहे. साखर, गूळ, दूध, खवा, मसाले, सुकामेवा व गॅसच्या दरात झालेल्या वाढीचा थेट परिणाम मिठाईच्या किमतींवर झाला असून, विविध प्रकारच्या मिठाईच्या दरात जवळपास १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

त्यामुळे गणेशोत्सवातील पेढ्याचा प्रसादही कमी प्रमाणात द्यायचा का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडू लागला आहे. यावर्षी साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत होलसेल बाजारात साखर ४९ ते ५२ रुपये प्रतिकिलो, तर किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.

तसेच दूध दरातही वाढ झाली असून दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढल्याने मिठाई उत्पादकांच्या खर्चात मोठी भर पडली आहे. मिठाई तयार करण्यासाठी आवश्यक खव्याचे दरही वाढले असून, सध्या खवा २४० ते ३९० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे.

सुकामेवा, मसाले तसेच इतर कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने मिठाई विक्रेत्यांना दरवाढ करणे अपरिहार्य झाले आहे. गॅसच्या वाढलेल्या किमतीचाही उत्पादन खर्चावर परिणाम होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

नवी मुंबईतील मिठाई विक्रेत्यांनी सांगितले की, मिठाई निर्मितीसाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे वाढता उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी मिठाईच्या किमतीत वाढ करावी लागत आहे. परिणामी, सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे.

एकीकडे गणेशोत्सव व आगामी नवरात्रोत्सव-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईला मोठी मागणी असते. मात्र, वाढत्या किमतींमुळे यंदा ग्राहकांना मिठाई खरेदी करताना बजेटचा विचार करावा लागत असून, उत्सवाच्या गोडव्यात महागाईची कडवट चव मिसळल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सुकामेव्याच्या मिठाईने गाठला हजाराचा टप्पा

सामान्य मिठाईच्या दुकानांमध्ये काही प्रमाणात दर अद्याप ग्राहकांच्या आवाक्यात असले तरी, प्रसिद्ध दुकानांमध्ये मिठाईचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे चित्र आहे. काही दुकानांमध्ये पेढे व बर्फी ८०० ते १,००० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. तसेच बुंदी, बेसन व डिंकाचे लाडू ६०० ते ८०० रुपये प्रतिकिलो, हलवा ८०० ते १,४०० रुपये प्रतिकिलो, तर ड्रायफ्रूट चिक्की १,००० ते १,५०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT