Mira Road Stabbing Case: मुंबईजवळील मिरा रोड येथे घडलेल्या चाकू हल्ला प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २७ एप्रिल रोजी बांधकाम सुरू असलेल्या एका ठिकाणी दोन सुरक्षा रक्षकांवर चाकूने हल्ला करणाऱ्या ३१ वर्षीय झैब जुबेर अन्सारीने घरात एक चिठ्ठी ठेवली होती. या चिठ्ठीत त्याने स्वतःला ISIS समर्थक असल्याचे सूचित करत 'लोन वुल्फ अॅटॅक' (एकाच व्यक्तीने स्वतःच्या पातळीवर प्लॅनिंग करून केलेला हिंसक किंवा दहशतवादी हल्ला) असा मजकूर लिहिल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अन्सारीला हल्ल्यानंतर आपण जिवंत राहणार नाही असे वाटत होते. पोलिस चकमकीत आपला मृत्यू होईल, अशी त्याची अपेक्षा होती. त्यामुळेच त्याने घरात ही चिठ्ठी ठेवली होती. ही चिठ्ठी पेन्सिलने लिहिलेली असून ती त्याच्या लॅपटॉपजवळ मुद्दाम दिसेल अशा ठिकाणी ठेवण्यात आली होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांना अन्सारीच्या घरातून दोन मोबाईल फोनही मिळाले. मात्र दोन्ही फोन पूर्णपणे फॉरमॅट करण्यात आले होते. तपास अधिकाऱ्यांच्या मते, संभाव्य संपर्क किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने हे केले असावे. त्यामुळे या प्रकरणात बाहेरील कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यानंतर अन्सारी घरी परतला आणि त्याने काळा कुर्ता घातला होता. त्याने हे “ISIS विचारसरणीशी संबंधित” असल्याचे सांगितल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. तपासात असेही समोर आले आहे की, तो काही कट्टरतावादी वेबसाईट्स आणि प्रो ISIS यूट्यूब चॅनेल्स पाहत होता.
मात्र अन्सारीच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याचे वकील अॅड. अब्दुल वहाब खान यांनी दावा केला की, पोलिसांनी अन्सारीला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे घर सील केले नव्हते. त्यामुळे घरात कोणतीही वस्तू ठेवली जाऊ शकत होती. “ही चिठ्ठी मुद्दाम ठेवण्यात आली असू शकते. पुरावे बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असा दावा त्यांनी केला आहे.
तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान अन्सारीने आपण एकटे राहत असल्याचे सांगितले. लोक आपल्याशी चांगले वागत नाहीत, तसेच भाड्याने घर मिळण्यातही अडचणी येत असल्याचे त्याने म्हटले. काही काळ तो मानसिक तणावात होता आणि आत्महत्येचाही विचार केला होता, असेही त्याने चौकशीत सांगितल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तपास यंत्रणा त्याच्या सर्व दाव्यांवर पूर्ण विश्वास ठेवण्यास तयार नाहीत.
तपासात असेही उघड झाले आहे की, अन्सारी काही वर्षांपूर्वी अमेरिकेत राहत होता. तो लहानपणी कुटुंबासह अमेरिकेत गेला होता आणि त्याचे शिक्षणही तिथे झाले. नोकरी न मिळाल्याने तो भारतात परतला.
कोविड काळात तो ऑनलाईन शिकवणीचे काम करत होता. त्याचे लग्न अमेरिकेत राहणाऱ्या अफगाण वंशाच्या महिलेशी ऑनलाईन झाले होते, मात्र नंतर त्यांचा घटस्फोट झाला. गेल्या काही महिन्यांपासून तो एकटाच राहत होता.
या प्रकरणातील फिर्यादीनुसार, अन्सारीने सुरक्षा रक्षकांना त्यांचा धर्म विचारल्यानंतर त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात एक सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरा रक्षक किरकोळ जखमी झाला आहे.
सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मीरा भाईंदर पोलीस करत होते. मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपास नंतर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे. तपास यंत्रणा आता अन्सारीच्या डिजिटल उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी करत असून त्याचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी प्रत्यक्ष संपर्क होता का, याचा शोध घेत आहेत.