Mira Road Helicopter Flower Shower Pudhari
मुंबई

Mira Road Helicopter Flower Shower: हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी महागात; आयोजक, पायलट आणि मालकावर गुन्हा

हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी महागात; आयोजक, पायलट आणि मालकावर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड : घोडबंदर गावातील रामेश्वर महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात विनापरवाना हेलिकॉप्टरचा वापर करून पुष्पवृष्टी करणे आयोजकांना महागात पडले आहे. सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून मानवी जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी काशीगाव पोलिसांनी आयोजक विराराम देवासी यांच्यासह हेलिकॉप्टर चालक आणि मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

घोडबंदर येथील रामेश्वर महादेव मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे रविवार 15 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान दुपारी 12 व पुन्हा 12:35 या वेळेत एका खाजगी हेलिकॉप्टरद्वारे मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या हेलिकॉप्टर सेवेसाठी कोणत्याही सक्षम प्राधिकृत विभागाची किंवा पोलीस प्रशासनाची पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे विनापरवाना हेलिकॉप्टर कमी उंचीवर उडवून पुष्पवृष्टी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती, असे पोलिसांनी म्हटले आहे.

याप्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात आरोपी विराराम देवासी, हेलिकॉप्टर चालक आणि मालक यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलमासह महाराष्ट्र पोलीस कायद्याचे विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, सार्वजनिक कार्यक्रमांत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश पाटील करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT