Scam Pudhari
मुंबई

Ministry employees financial scam : मंत्रालय पतपेढीच्या माजी महाव्यवस्थापकांकडून साडेसात कोटींचा गैरव्यवहार; प्रकरण पोलिसांत

सहकार विभागाच्या अपर निबंधकांनी (पतसंस्था ) या प्रकरणाची गंभीर दखल घेत माजी महाव्यवस्थापक रा. गो. तावडे यांच्यासह तत्कालीन संचालकांकडून संपूर्ण रक्कम वसुलीसाठी चौकशीचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : चंदन शिरवाळे

राज्य सरकारी कर्मचारी चालवीत असलेल्या दि महाराष्ट्र मंत्रालय शासकीय कर्मचारी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माजी महाव्यवस्थापकांकडून तब्बल ७ कोटी ३९ लाख ९३ हजार ५५४ रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे.

सहकार विभागाच्या अपर निबंधकांनी (पतसंस्था ) या प्रकरणाची गंभीर दखल घेत माजी महाव्यवस्थापक रा. गो. तावडे यांच्यासह तत्कालीन संचालकांकडून संपूर्ण रक्कम वसुलीसाठी चौकशीचे आदेश दिले आहेत. या आदेशाने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, सदरचे माजी महाव्यवस्थापक अनेक वर्षांपासून या पदावर होते. मात्र, सहकार कायद्यानुसार केवळ अलिकडील ५ वर्षामधील प्रकरणांचीच चौकशी केली जाते. त्यानुसार अपर निबंधकांनी २०१७-१८ ते २०२१-२२ या कालावधीतील संस्थेच्या लेखापरीक्षण अहवालाची तपासणी केली असता ७ कोटी ३९ लाख ९३ हजार ५५४ रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. अन्यथा रकमेचा हा आकडा किमान २६ कोटी रुपयांपर्यंत गेला असता, अशी शक्यता एका विद्यमान संचालकाने व्यक्त केली.

सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर या पतसंस्थेचे पदाधिकारी राहता येत नाही मात्र तावडे यांनी नियमाचा भंग करून त्या पदावर कायम राहिले इतकेच नाही तर भरमसाट वेतनही घेत राहिले. स्वतःच्या आयकराचा भरणा त्यांनी पतसंस्थेच्या रकमेतून केला.

पतसंस्थेच्या वार्षिक सभेसाठी मंत्रालयातील सहावा मजला अवघ्या पाचशे रुपयांत भाड्याने मिळत असतानाही त्यासाठी तावडे यांनी अधिकचा खर्च दाखविला. नावात मंत्रालय असलेल्या या पतसंस्थेचा सरकारशी काही संबंध नाही. मात्रे तावडे यांनी या पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना आणि स्वतःलाही वेतन आयोग लागू केला. इतकेच नाही तर टीडीएस कापायचा की नाही याचा सल्ला घेण्यासाठी त्यांनी एका संस्थेला एक कोटी छत्तीस लाख तीस हजार रुपये दिले.

संचालक किंवा कर्मचारी आजारी असल्यास पतसंस्थेकडून औषधोपचाराचा खर्च दिला जात नाही. परंतु तावडे यांनी स्वतःच्या उपचाराचे पतसंस्थेला ४ लाख २८ हजार रुपये रुग्णालयाचे बिल अदा करण्यास भाग पाडले. इतकेच नाही तर पतसंस्थेच्या संकल्प भवन इमारतीच्या कामासाठी खर्च झालेल्या एकूण रकमेच्या तीन टक्के रक्कम म्हणजे २ लाख ५९ हजार रुपये स्वतःचा मुलगा सुशील तावडे यांना रोखीने अदा केले.

२०१४-१५ मध्ये पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध केली म्हणून संचालकांचा ठराव दर्शवून तावडे यांनी विदेशवारीसाठी ६ लाख रुपये खर्च केले. याशिवाय, कर्मचाऱ्यांच्या हजेरीपटात फेरफार करून व नियमबाह्य ज्यादा कामकाज भत्ता दर्शवून २ लाख ५० हजार रुपये घेतल्याचे लेखापरीक्षणाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.अपर निबंधक मिलिंद भालेराव यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर गैरव्यवहाराबाबत विशेष लेखापरीक्षक उमेश तुपे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दहा मोठे आकडे : अपर निबंधकांनी कलम ८८ अन्वये तावडे यांच्याबाबत जबाबदारी निश्चित करण्याठीचे मुद्दे निश्चित केले त्‍यातहील हे मोठे आकडे

  1. वेतनाव्दारे कपात न केलेला आयकर पतसंस्थेच्या तिजोरीतून आयकर कार्यालयाकडे भरला. रक्कम रुपये १४ लाख ४३ हजार ९३१

  2. निवृत्तीनंतर दिलेल्या मुदत वाढीच्या कालावधीची अदा केलेली ग्रॅच्युईटी (उपदान)- रक्कम रुपये २५ लाख ६ हजार ,९२१.

  3. सेवानिवृत्तीनंतर देण्यात आलेली मुदतवाढ व अदा केलेले वेतन व भत्ते- रक्कम रुपये १ कोटी ९६ लाख ८४ हजार ४८२.

  4. सभासदांना ऑगस्ट २०१९ व ऑगस्ट २०२० मध्ये वाटप केलेला लाभांश व संस्थेच्या कॅशबुकला नोंद केलेल्या लाभांश रकमेतील तफावत रक्कम रु.१६ लाख

  5. कमी आणि पात्र शिक्षण नसताना स्वतःचा मुलगा सुशिल रामचंद्र तावडे यांची नेमणूक. त्यापोटी वेतन व भत्ते- रुक्कम रु.५१ लाख १८ हजार ८७८.

  6. आकस्मिक निधीतून केलेल्या खर्चाबाबत रक्कम रुपये ३७ लाख २५ हजार.

  7. सभासद परस्पर सहाय्यक निधी व येणे कर्ज खात्यातून केलेला अपहार- रक्कम रुपये १० लाख.

  8. लेखापरीक्षण फी (शासकीय/ अंतर्गत) अदा करताना केलेली अनियमितता रक्कम ५७ लाख १८ हजार ४००.

  9. प्रोफेशनल फीसाठी करण्यात आलेला खर्च जे वझीराणी ॲण्ड असो. रक्कम रुपये १ कोटी ३६ लाख ३० हजार ३७५.

  10. पदाधिकारी यांना देण्यात आलेले मानधन- रक्कम रुपये २८ लाख ८८ हजार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT