पुढारी ऑनलाईन डेस्क
विधान परिषद निवडणुकीसाठी (Maharashtra Legislative Council polls) शिवसेना ठाकरे गटाने पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. नार्वेकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीच्या शरद्रचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख तसेच महाविकास आघाडीचे इतर नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत एबी फॉर्म देण्यात आला, अशी माहिती शिवसेना ठाकरे पक्षाने X वरील पोस्टमधून दिली आहे.
विधानसभेतून विधान परिषदेवर पाठवायच्या रिक्त ११ जागांसाठी महायुती ९ आणि महाविकास आघाडी २ असा समेट झाल्यामुळे विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. महायुतीत भाजप ५, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रत्येकी २ तर महाविकास आघाडीत काँग्रेस १ आणि शेकाप १ असे उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत.
आज मंगळवारी २ जुलैला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तर ३ जुलैला उमेदवारी अर्जाची छाननी होईल. त्यानंतर ५ जुलैला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. याच दिवशी निवडणूक बिनविरोध झाल्यास अकराही उमेदवारांना विजयी घोषित केले जाईल. दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेचे ११ आमदार २७ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. या रिक्त ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदानाची तारीख आहे.