MHT CET Engineering Pudhari
मुंबई

MHT CET Engineering: इंजिनीअरिंगकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा; एमएचटी-सीईटीत गतवर्षीच्या नोंदणीच्या तुलनेत 84 हजारांची वाढ

आयटी, एआय आणि डेटा सायन्स शाखांना मोठी मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पवन होन्याळकर

राज्यात बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांकडे वाढता ओढा एमएचटी-सीईटीला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आकडेवारीतून स्पष्टपणे दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत पीसीएम गटातील नोंदणीत तब्बल 84 हजार 468 विद्यार्थ्यांची वाढ होऊन ती यंदा 4 लाख 64 हजार 262 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच देण्यात आलेल्या दुहेरी संधीमुळे नोंदणी वाढीस चालना मिळाली असली, तरी मागील तीन वर्षांपासून सातत्याने होत असलेली वाढ आणि यंदा झालेली नोंदणी यातून इंजिनिअरिंगकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल दिसून येत आहे.

अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रासाठी आता शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे पहिले शैक्षणिक वर्ष अभूतपूर्व ठरले. गेल्या काही वर्षांपेक्षा 2025-26 या प्रवेश हंगामात अभियांत्रिकी पुन्हा एकदा तरुणाईचे आकर्षणकेंद्र ठरले आहे. राज्यभरातून यंदा 2 लाख 22 हजार 402 विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी पदवीसाठी अर्ज दाखल केले होते. 2 लाख 2 हजार 883 जागांपैकी तब्बल 1 लाख 66 हजार 746 जागा भरल्या. गेल्या वर्षी ही संख्या 1 लाख 49 हजार 78 इतकीच होती. 17 हजार 700हून अधिक विद्यार्थ्यांनी गतवर्षीच्या तुलनेत अभियांत्रिकीला पसंती दिली होती.

गतवर्षी विद्यार्थ्यांची पसंती स्पष्टपणे कॉम्प्यूटर इंजिनीरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखांकडे वळली. कॉम्प्यूटर इंजिनीरिंगमध्ये 32 हजार 245 जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी 27 हजार 995 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेत 15 हजार 187 विद्यार्थी प्रवेशित झाले. याशिवाय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स , मशिन लर्निंग, डेटा सायन्स आणि सायबर सिक्युरिटी या नव्या युगातील शाखांत उपलब्ध जागापैकी 90 टक्के पेक्षा जास्त प्रवेश झाले

होते.

एमएचटी-सीईटी प्रवेश नोंदणीस 19 व 20 मार्च रोजी विशेष मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची अंतिम मुदत 27 फेब्रुवारी रोजी संपल्यानंतर राज्यभरातून विद्यार्थ्यांच्या विनंत्या मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्या होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सीईटी कक्षाने ही विशेष संधी उपलब्ध करून दिली असून, अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांनी तत्काळ नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

का वाढतोय इंजिनिअरिंगकडे कल?

आयटी, एआय, डेटा सायन्स, ऑटोमेशन यांसारख्या क्षेत्रांमध्ये वाढती संधी ग्लोबल जॉब मार्केटमध्ये इंजिनिअरिंग पदवीधारकांना मागणी

स्टार्टअप व तंत्रज्ञान क्षेत्रातील आकर्षण

मेडिकल शिक्षणाची मर्यादित जागा, अमाप शुल्क व दीर्घ अभ्यासकाळ यामुळे इकडे प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असू शकतो.

स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता

वाढत्या नोंदणीमुळे यंदा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नामांकित महाविद्यालयांमध्ये कट-ऑफ वाढण्याची चिन्हे आहेत.

यंदा विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटीसाठी दोन संधी देण्यात येणारआहेत. पहिल्या संधीसाठी 7 लाख 57 हजार 092, तर दुसऱ्या संधीसाठी 3 लाख 99 हजार 063 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT