मुंबई : राज्यातील कृषी व संलग्न पदवी अभ्यासक्रमांच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रीया संपली असून, एकूण 16 हजार 829 जागांपैकी 14 हजार 417 प्रवेश पूर्ण झाले आहेत. म्हणजेच 85 टक्क्यांपेक्षा जास्त जागा यंदा कृषी अभ्यासक्रमांच्या भरल्या आहेत.
एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी सेल) कृषी विभागाकडून प्रवेश परीक्षेला सुरूवात केली. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व फेर्यांमध्ये कृषी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा कल पहायला मिळाला आहे. कमी जागा व आशादायी करिअर असलेल्या अभ्यासक्रमांकडे अधिक दिसत आहे.
सीईटी सेलच्या आकडेवारीनुसार, कृषी पदवी अभ्यासक्रमांमध्ये 85 टक्क्यांपेक्षा अधिक प्रवेश पूर्ण झाले आहेत. पारंपरिक अॅग्रीकल्चर शाखा, फूड टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, फिशरी व फॉरेस्ट्रीसारख्या विशेष अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल लक्षणीय वाढला आहे. मात्र कम्युनिटी सायन्स व कृषी अभियांत्रिकीमध्ये अपेक्षेपेक्षा कमी प्रवेश झाले आहेत. नऊ विद्याशाखांपैकी पारंपरिक व प्रमुख अभ्यासक्रम असलेल्या बी.एस्सी (ऑनर्स अॅग्रीकल्चर) मध्ये सर्वाधिक प्रवेश झाले आहेत.
या शाखेत 11 हजार 500 पैकी 10 हजार 608 जागा भरल्या गेल्या असून प्रवेशाचे प्रमाण जवळजवळ 92 टक्के आहे. बीएफएस्सी (फिशरी सायन्स) या शाखेत उपलब्ध 38 पैकी सर्व 38 जागा 100 टक्के भरल्या गेल्या आहेत. तसेच बीएस्सी (ऑनर्स फॉरेस्ट्री) मध्ये 78 पैकी 74 जागा भरल्या गेल्या असून जवळपास पूर्ण क्षमतेने प्रवेश पूर्ण झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला आहे.
बी.टेक (फूड टेक्नॉलॉजी) मध्ये 1 हजार 352 पैकी 900 प्रवेश झाले (66.5 टक्के). बीटेक (बायोटेक्नॉलॉजी) मध्ये 987 पैकी 667 प्रवेश (67.5 टक्के) झाले आहेत. तर बी.टेक (अॅग्रीकल्चर इंजिनिअरिंग) मध्ये तुलनेने कमी प्रतिसाद दिसून आला असून 840 पैकी 502 प्रवेश (59.7 टक्के) झाले आहेत.
राज्यातील 47 शासकीय महाविद्यालयांत 95 टक्क्यांहून अधिक जागा भरल्या गेल्या आहेत. मात्र 151 खासगी महाविद्यालयांत 79 टक्केच प्रवेश पूर्ण झाले असून 2 हजार 774 जागा अद्याप रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा अजूनही शासकीय महाविद्यालयांकडेच अधिक असल्याचे दिसते. व्यवस्थापन कोट्यातून 831 जागांपैकी 525 प्रवेश झाले असून 63 टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी (2024-25) याच कोट्यात प्रवेशाचे प्रमाण 50 टक्क्यांच्या खाली होते. यावर्षी प्रवेशात झालेली वाढ ही खासगी संस्थांसाठी काही प्रमाणात दिलासा देणारी आहे.