MHADA Lottery Pudhari
मुंबई

MHADA Mumbai Lottery: म्हाडाच्या 2640 घरांसाठी सोडत; आजपासून ऑनलाईन अर्जभरणा

9 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी सर्वाधिक घरे

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे मुंबईतील 2 हजार 640 सदनिकांसाठी 15 मे रोजी सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी सोमवार दिनांक 30 मार्चला दुपारी 3 वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे; मात्र यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी केवळ 145 घरे असून 9 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या मध्यम उत्पन्न गटासाठी सर्वाधिक घरे आहेत.

ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला आज 30 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपासून प्रारंभ होणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 29 एप्रिल 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. तसेच ऑनलाईन अनामत रकमेची स्वीकृती 30 एप्रिलला रात्री 11.59 वाजेपर्यंत केली जाणार आहे. आरटीजीएस/ एनईएफटीद्वारे 30 एप्रिलपर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत

सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी 5 मे रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती दाखल करण्यासाठी 8 मे रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी 12 मे रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. 15 मे रोजी सकाळी 11 वाजता सोडत काढली जाणार आहे.

या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे बांधकाम सुरू असलेल्या 1 हजार 762 सदनिका, विकास नियंत्रण नियमावली 33 (5) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त 371 सदनिका, विकास नियंत्रण नियमावली 33 (7) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त 188 सदनिकांचा समावेश आहे. तसेच मुंबई मंडळाच्या मागील सोडतींमधील विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या विकास नियंत्रण नियमावली 33 (5), 33 (7) व 58 अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त व मंडळाच्या विखुरलेल्या 319 सदनिकाही सोडतीत आहेत. अर्जदारांना म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तसेच ॲपवरून अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया करता येणार आहे.

उत्पन्न गट उपलब्ध सदनिका उत्पन्नाची मर्यादा (वार्षिक)

अत्यल्प 145 6 लाखांपर्यंत

अल्प 858 6 ते 9 लाख

मध्यम 1408 9 ते 12 लाख

उच्च 229 12 लाखांपेक्षा अधिक

या ठिकाणी आहेत घरे

कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरिवली, गोराई-बोरिवली, सुभाष नगर-चेंबूर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT