

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. ‘‘ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जातोय,’’ असे म्हणत मिटकरींनी पक्षंतर्गत वादाला तोंड फोडले असून, त्यांचा हा रोख नेमका कोणाकडे आहे, यावरून आता तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
अमोल मिटकरी यांनी आपल्या अधिकृत 'एक्स' हँडलवरून पक्षातील सद्यस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे का? असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दिवंगत अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांचे फोटो वापरून म्हटलंय की, “ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जातोय, हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही.राष्ट्रवादीच्या दैवतांना डावलून स्वत: देव बनण्याचा कुणी प्रयत्न करू नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही.” राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना किंवा प्रमुखांना डावलले जात असल्याचे संकेत या पोस्टमधून त्यांनी दिले आहेत का, याची चर्चा आता रंगू लागली आहे.
मिटकरींनी आपल्या पोस्टमध्ये केवळ नाराजीच व्यक्त केली नाही, तर थेट इशाराही दिला आहे. ‘‘राष्ट्रवादीच्या दैवतांना डावलून स्वतः देव बनण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही,’’ अशा कडक शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. पक्षाच्या स्थापनेपासून ज्यांनी संघटना उभी केली, अशा 'दैवत' मानल्या जाणाऱ्या नेत्यांना बाजूला सारून नवीन नेतृत्व स्वतःचीच प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत असल्याची कुजबुज सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) काही मुद्द्यांवरून अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या. अमोल मिटकरी यांच्या या पोस्टने त्या चर्चांना अधिक बळ दिल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीच्या काळात किंवा महत्त्वाच्या कार्यक्रमांत कोणाचे फोटो लावायचे आणि कोणाचे टाळायचे, यावरून पक्षात दोन गट पडले आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मिटकरींच्या या सूचक विधानानंतर पक्षातील वरिष्ठ नेते यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.