मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2024 सालच्या सोडतीतील दिंडोशी येथील प्रकल्प अडचणीत सापडला आहे. शिवधाम कॉम्प्लेक्स या प्रकल्पाचा त्रैमासिक अहवाल महारेराकडे जमा करण्यास विलंब झाल्याने ग्राहकांना या घरांसाठी कर्ज मिळणे कठीण झाले आहे.
शिवधाम कॉम्प्लेक्स येथे अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 90 घरे बांधण्यात आली आहेत. 2024 साली या घरांची सोडत निघाली तेव्हा त्यांचे बांधकाम सुरू होते. यावर्षी नोव्हेंबरमध्ये या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्यामुळे घरांचे शुल्क भरण्यासाठी सोडत विजेत्यांना 11 नोव्हेंबरला पत्र देण्यात आले. त्यानंतर 45 दिवसांच्या आत 25 टक्के रक्कम भरायची आहे. ही रक्कम न भरल्यास व्याज आकारले जाणार आहे.
सोडत विजेत्यांनी बँकांकडे कर्ज मिळवण्यासाठी अर्ज केला असता बँकांनी त्यांना कर्ज देण्यास नकार दिला आहे. दरम्यान, या प्रकल्पाचा महारेरा तपशील पूर्ण नसल्यामुळे बँकांनी कर्ज देण्यास असमर्थता दर्शविली आहे.
प्रकल्पाचा त्रैमासिक अहवाल महारेराकडे जमा करण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे महारेराकडील अर्ज बाद झाला असून याबाबत महारेराला कळवण्यात आले आहे. पुढील आठवड्यापासून ही अडचण दूर होईल व सोडत विजेत्यांना कर्ज मिळू शकेल, अशी माहिती गोरेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता विहार बोडके यांनी दिली.