Eknath Shinde and Devendra Fadnavis Pudhari
मुंबई

MHADA Chairman Post: म्हाडाचे अध्यक्षपद कोणाला मिळणार? भाजप-शिंदे शिवसेनेत जोरदार रस्सीखेच

म्हाडा भाजपला द्या, सिडको घ्या; भाजपची शिंदे गटाला ऑफर

पुढारी वृत्तसेवा

नरेश कदम

मुंबई: महायुती सरकारचे महामंडळाचे वाटप अंतिम टप्प्यात आले असताना, ‘म्हाडा’च्या अध्यक्षपदासाठी भाजप आणि शिंदे शिवसेनेत संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

महायुती सरकार सत्तेवर येऊन दोन वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु महामंडळे, मंडळे आणि समित्यांवरील नियुक्त्या रखडल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात आमदारांच्या संख्येवर महामंडळे, मंडळे तसेच इतर समित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय झालेला आहे.

ज्यांच्याकडे जे खाते असेल त्या खात्यांशी संबंधित महामंडळे, मंडळे आणि समित्यांचे अध्यक्षपद त्या पक्षाकडे देण्यात येईल, असे ठरले आहे. पण याबाबत काही महामंडळे अपवाद करण्यात आल्याचे सांगितले जाते.

नगरविकास आणि गृहनिर्माण ही दोन्ही महत्वाची खाती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. गृहनिर्माण खात्याच्या अखत्यारित म्हाडा आणि विभागीय म्हाडा ही महत्वाची मंडळे आहेत. पण यातील पूर्ण म्हाडाचे अध्यक्षपद हे भाजपला हवे आहे.

पण शिंदे गटाच्या मुंबईतील एका माजी खासदारासाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे म्हाडाच्या अध्यक्षपदासाठी आग्रही आहेत.

तर भाजपला हे पद हवे आहे. मंत्रिपद हुकलेल्या एका आमदाराला हे पद द्यायचे आहे. म्हाडाचा आग्रह धरू नका, याबदल्यात सिडकोचे अध्यक्षपद शिंदे शिवसेनेने घ्यावे, असा भाजपचा प्रस्ताव आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षपद हे आता फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या वाट्याला आले आहे.

पर्यावरण खाते भाजपकडे आहे. तसेच मध्यंतरी काही बहुराष्ट्रीय कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली होती. त्यामुळे उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राबाबत चुकीचा संदेश गेला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात मोठी गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे बहुराष्ट्रीय कंपन्यांना अशा नोटिस देण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री नाराज होते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ भाजप स्वतःकडे ठेवणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT