मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या जबाबदारीनुसार म्हाडा मुख्यालयात बोलावलेल्या अभ्युदयनगर पुनर्विकास बैठकीत महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल व सर्वपक्षीय प्रतिनिधी. pudhari photo
मुंबई

MHADA Redevelopment : अभ्युदय नगर पुनर्विकासाबाबतचा संभ्रम दूर; प्रकल्पाला लवकरच सुरुवात होणार

म्हाडा कार्यालयातील बैठकीत रहिवाशांच्या अनेक मागण्या म्हाडाकडून मान्य

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : काळाचौकी येथील अभ्युदय नगरच्या पुनर्विकासासंदर्भात निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. सोमवारी महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या पुढाकाराने व म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाबाबत रहिवाशांच्या मागण्यांवर म्हाडाच्या उपाध्यक्षांनी सविस्तर खुलासे केले आणि रहिवाशांच्या अनेक मागण्या मान्यही केल्या. परिणामी पुनर्विकासाबाबत निर्माण झालेला तिढा सुटला असून या प्रकल्पाला लवकरात लवकर सुरुवात होईल, असा विश्वास आ. दरेकर यांनी व्यक्त केला.

या बैठकीला म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर, भाजपा विधान परिषद आमदार चित्रा वाघ, मनसे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना उबाठा गटाचे आमदार अजय चौधरी, अभ्युदय नगर गृहनिर्माण संस्थांच्या महासंघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार काटकर, विलास सावंत यांसह अभ्युदय नगरमधील ४८ सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

या बैठकीत म्हाडा उपाध्यक्षांनी प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण देखील केले. आ. प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, रहिवाशांच्या मनात या प्रकल्पाबाबत काही शंका असल्याने प्रकल्प पुढे सरकत नव्हता. याबाबत सर्वपक्षीय बैठक घेऊन या शंका दूर करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर आणि म्हाडा उपाध्यक्षांवर टाकली होती. त्यानुसार अभ्युदय नगरमधील सर्व ४८ सहकारी गृहनिर्माण संस्थांचे आणि महासंघाचे पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते यांना बैठकीला आमंत्रित करण्यात आले होते.

या बैठकीत रहिवाशांच्या मनातील सर्व प्रश्न आणि मागण्यांवर चर्चा झाली. रहिवाशांच्या बहुतांश मागण्या म्हाडाकडून मान्य करण्यात आल्या. म्हाडा देऊ करीत असलेले ६४१ चौ. फूट क्षेत्रफळ वाढवून देण्याबाबत काही मोजक्या लोकांचा आग्रह आहे. हा प्रकल्प व्हाएबल करायचा असेल तर या मागणीचा जास्त आग्रह लोकांनी धरू नये, अन्यथा विकासक या प्रकल्पातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. तसे झाले तर प्रकल्प आणखी लांबणीवर पडेल, असे स्वतः म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी आकडेवारीसह रहिवाशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

वाढीव भाडे मिळण्याचीही मागणी रहिवाशांची होती. पूर्वी २० हजार रुपये भाडे प्रस्तावित करण्यात आले होते, ते मुख्यमंत्र्यांनी २५ हजार रुपयांपर्यंत वाढवले. आता त्यातही वाढ करण्याची रहिवाशांची मागणी आहे. मी आणि उपाध्यक्ष मुख्यमंत्र्यांपर्यंत ही मागणी पोहोचवणार आहोत. या दोन मागण्यांव्यतिरिक्त इतर सर्व मागण्या बैठकीत मान्य झाल्या आहेत, अशी माहिती दरेकरांनी दिली.

आता रहिवाशांनी संमती पत्र देण्यास सुरुवात करावी आणि हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी सकारात्मक व्हावं, असे आवाहन आपण स्वतः केले आहे. रहिवाशांनीही ते मान्य केले आहे. 'आता कोणीही यात राजकारण आणू नका, पाहिजे तर क्रेडिट तुम्ही घ्या पण रहिवाशांची दिशाभूल न करता हा प्रकल्प सुरू होण्यास मदत करा', असे आवाहनही दरेकर यांनी शेवटी सर्वपक्षीय नेत्यांना केले.

रहिवाशांच्या मागण्या

  • रहिवाशांकडून घेण्यात येणाऱ्या संमती पत्रात '६४१ चौ. फूट कार्पेट एरिया' या ऐवजी सभासदांना समजेल अशा सोप्या भाषेत युजेबल कार्पेट एरिया असा उल्लेख करावा.

  • ६४१ चौ. फुटामध्ये नेमके कोणते क्षेत्र समाविष्ट आहे, कोणते नाही याची स्पष्ट माहिती संमती पत्रात किंवा परिशिष्टात म्हाडाने द्यावी.

  • अभ्युदय नगर रहिवाशांच्या कायदेशीर सल्लागारांनी संमती पत्राचा मसुदा म्हाडाला दिलेला आहे, तो अंतिम करावा.

  • संमती पत्राची प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने राबवावी.

  • संमती पत्रात 'Bare Shell' फ्लॅट ऐवजी सहज समजेल असा शब्दप्रयोग करावा.

  • संमती पत्रात पार्किंगच्या बाबतीत केवळ '१ कार पार्किंग' असा उल्लेख आहे. पार्किंगचा 'प्रकार' स्पष्टपणे नमूद करावा.

  • पुनर्विकास आराखड्याचे प्रेझेंटेशन करावे.

  • तक्रार निवारण समिती गठित करावी.

म्हाडाचा प्रतिसाद

  • संमती पत्रात युजेबल कार्पेट एरिया असा उल्लेख करण्यात येईल. सभासदांना ६४१ चौ.फु. मोफा कार्पेट एरिया देण्यात येईल.

  • संमती पत्र व PAAA मध्ये याची स्पष्टता आणण्यात येईल.

  • हा मसुदा तपासून घेण्यात येईल.

  • दोन्ही पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्यात येईल.

  • याबाबतची पूर्ण स्पष्टता आवश्यक त्या कागदपत्रात आणण्यात येईल.

  • सभासदांच्या मागणीनुसार "पोडियम पार्किंग"देण्यात येणार आहे. तसा उल्लेख करण्यात येईल.

  • प्रत्येक घराचा, मजल्याचा लेआउट कसा असेल, podium parking view, Typical floor plan, Rehab building, Sale building, MHADA building, मूलभूत सुविधांबाबत अभ्युदय नगरच्या ग्राउंडवर सर्व सभासदांसाठी प्रेझेंटेशन करण्यात येईल.

  • समिती गठित करण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT