मुंबई: मेट्रो ७ अ मार्गिकेसाठी २६० कोटी खर्च करून उन्नत मार्गिका उभारण्यात आली; मात्र उंचीचा अंदाज चुकल्याने आता ही मार्गिका तोडण्याची वेळ एमएमआरडीएवर आली आहे. यासाठी एमएमआरडीएने सल्लागार कंपनीवर ठपका ठेवला आहे.
दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेचा विस्तार म्हणून ७ अ मार्गिका उभारली जात आहे. ही मार्गिका ३.४४ किमीची असून २.४९ किमीचा भाग भुयारी तर १ किमीचा भाग उन्नत आहे. मार्गिकेचे ७०.७८ टक्के काम पूर्ण झाले आहे.
मात्र आता विमानतळ प्राधिकरणाचा उंचीचा नियम आड येत आहे. विमानतळाभोवतीच्या ठरावीक परीघात ठरावीक उंचीच्या वर बांधकाम करता येत नाही. ही बाब उशिरा लक्षात आल्याने आता हा २६० कोटींचा पूल तोडावा लागण्याची शक्यता आहे.
मेट्रो मार्गिका ७ अ प्रकल्पासाठी सीस्ट्रा-सीईजी-एसएमसीआयएल यांची जनरल कन्सल्टंट/इंजिनिअर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पाचे डिझाइन तसेच विमानतळ परिसरातील उंचीच्या मर्यादांसह आवश्यक सर्व परवानग्यांचा समन्वय करण्याची जबाबदारी सल्लागाराची होती.
मात्र, ओव्हरहेड यंत्रणेसाठी लागणाऱ्या अतिरिक्त उंचीची आवश्यकता डिझाइन आणि नियोजनाच्या योग्य टप्प्यावर सल्लागाराकडून पुरेशा प्रमाणात विचारात घेण्यात आली नाही, असे स्पष्टीकरण एमएमआरडीएने दिले आहे.
अतिरिक्त उंचीच्या मंजुरीसाठी एमएमआरडीएकडून सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरू आहे. किती उंचीची परवानगी देता येईल आणि त्यानुसार प्रकल्पात काही बदल करावे लागतील का, याबाबत प्राधिकरणाच्या अंतिम तांत्रिक अहवालाची प्रतीक्षा आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर एमएमआरडीए त्याचे सविस्तर तांत्रिक मूल्यमापन करून पुढील योग्य निर्णय घेईल. =- बसवराज एम. बी. संचालक, मेट्रो प्रकल्प