Mumbai Metro Pudhari
मुंबई

Mumbai Metro: मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार! Metro-13 प्रकल्पाला मान्यता; जाणून घ्या संपूर्ण मार्ग

मेट्रो मार्ग १३ च्या विस्तारीकरणास मान्यता

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीला चालना देण्यासाठी मेट्रो १३ -मिरा भाईंदर ते वसई विरार या प्रकल्पास तसेच पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्वाचा ठरणाऱ्या पुणे रिंगरोडच्या सोरतापवाडी ते वरवे - शिवरे मार्गास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

मिरा भाईंदर ते वसई विरार या मेट्रो मार्ग क्रमांक १३ या मार्गासाठी येत्या सहा महिन्यात भूसंपादन व पोहोच मार्ग तयार करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.

यामुळे रस्ते प्रवासाच्या तुलनेत प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी होणार आहे. औद्योगिक आणि लॉजिस्टिक केंद्रांसह वसई-विरार, मिरा-भाईंदर आणि मुंबई उपनगरांची जोडणीही या मार्गामुळे अधिक सक्षम होणार आहे.

बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, चंद्रशेखर बावनकुळे, शिवेंद्रसिंह भोसले, उदय सामंत, बाबासाहेब पाटील, हसन मुश्रीफ या मंत्र्यांसह अधिकारी उपस्थित होते.

पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित पुणे रिंग रोडच्या पूर्व विस्तारीकरण प्रकल्पाच्या १० हजार ५०२ कोटी ३६ लाख रुपयांच्या सुधारित प्रकल्प खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत या मार्गाचे काम करण्यात येणार आहे.

अशी असेल मेट्रो-१३

  • ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून जाणाऱ्या मेट्रो १३ -मिरा भाईंदर ते वसई-विरार मार्गाची उभारणी एमएमआडीए करणार असून, त्यासाठी १७ हजार ७२४ कोटी खर्च अपेक्षित आहे.

  • हा मार्ग मीरा रोड, वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार परिसरांना जोडणार आहे.

  • मिरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो १३ मार्ग नायगाव, नालासोपारा आणि विरार उपनगरी रेल्वे स्थानकाशी जोडल्यावर मेट्रो मार्ग क्रमांक ९ सोबत तो नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियम येथे जोडला जाईल.

  • लांबी २५.०३ किलोमीटर, त्यापैकी २१.७८ किमी मार्ग उन्नत, तर ३.२५ किमी मार्ग भूमिगत अशा या मेट्रो मार्गावर एकूण १६ स्थानके प्रस्तावित आहेत. त्यातील १३ स्थानके उन्नत आणि तीन भूमिगत असतील.

  • ४.९२ किलोमीटर लांबीच्या वसई खाडीवरील पांजू बेटाला जोडणारा सहा पदरी रस्ता व मेट्रो असलेल्या एकत्रित पुलाचे नियोजन आहे.

  • या प्रकल्पासाठी एकूण २४.८४ हेक्टर भूसंपादन अपेक्षित आहे. मान्यतेनंतर पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT