Mehkar Ancient Temples History Pudhari
मुंबई

Mehkar Ancient Temples History: आटपाट नगर मेहकर : प्राचीन मंदिर स्थापत्य आणि इतिहासाचा जिवंत खजिना

पद्मपुराण ते ऐन-ए-अकबरीपर्यंत उल्लेख; शारंगधर बालाजी, केशवराज आणि लक्ष्मी नृसिंह मंदिरांनी जपला १२व्या शतकाचा वैभवशाली वारसा

पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रात प्राचीन अमूल्य मंदिर स्थापत्याचा आणि त्यायोगे घडलेल्या इतिहासाचा खजिना भरलेला आहे. मेहकर हे बुलढाणा जिल्ह्यातलं एक अतिप्राचीन गाव. अतिप्राचीन अशासाठी की त्याचे संदर्भ लीळाचरित्र, पद्मपुराण, मत्स्यपुराण, ऐन-ए-अकबरी अशा ग्रंथांमध्ये सापडले आहेत. ऐन-ए-अकबरी ग्रंथात अल बरुनी याने म्हटलं आहे, मेहकर हे हिजरी सना आधी 795 वर्षे अस्तित्वात होतं. ऐन-ए-अकबरीमध्ये मेहकरचा उल्लेख सरकार किंवा महसूल जिल्हा मुख्यालय म्हणून केला आहे.

आटपाट नगर होतं

नीती मेहेंदळे

मध्ययुगात मेहकर हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. इ.स. 1769 मध्ये, पेशवा माधवराव, निजामाचा मंत्री रुकन-उद-दौला याच्यासोबत, रघुनाथरावांच्या बंडात मदत केल्याबद्दल जानोजी भोसले यांना शिक्षा करण्यासाठी जात असताना मेहकर येथे तळ ठोकला असा एक ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहे. हा मेहकरच्या प्राचीनत्वाचा ठोस पुरावाच झाला. पैनगंगा नदीकिनारी वसलेल्या या शहरात विष्णू देवतेच्या अनेक मूर्ती सापडल्या आहेत. म्हणजे हा भाग वैष्णव संप्रदायाच्या प्रभावाखाली असावा. इ.स. 1888 मध्ये झालेल्या एका उत्खननात शारंगधर बालाजी आणि काही अजून विष्णूच्या प्रतिमा व ताम्रपट सापडले.

त्याची वार्ता तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांना पोहोचली आणि त्यांनी त्या मूर्ती लंडनला न्यायची तयारी सुरू केली. स्थानिकांनी तसे होऊ नये म्हणून ताबडतोब तात्पुरती मंदिरं उभारून त्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. ज्यायोगे इंग्रजांना मूर्ती त्यांच्या देशात नेता आल्या नाहीत, मात्र त्यांनी ताम्रपट तेवढे नेलेच. मध्ययुगात परकीय आक्रमणावेळी त्या मातीत पुरलेल्या अवस्थेत असल्याने त्या अखंड शाबूत राहिल्या आहेत. विशेषत: या सगळ्या मूर्ती गंडकी पाषाणात घडवलेल्या आहेत. मूर्तींचा काळ 12वे शतक असल्याचं इतिहासकारांचं अनुमान आहे. त्यांपैकी एक वासुदेव मूर्ती विष्णू मंदिरात आहे. तिच्या पायाशी एका बाजूला नमस्कार मुद्रेत गरुड तर दुसऱ्या बाजूस लक्ष्मी दिसते. प्रभावळीत दशावतार कोरलेले आढळतात. शिवाय सेवक आणि वादक कोरलेले आहेत.

दुसरी मूर्ती केशवराज मंदिर हे बालाजी मंदिर परिसरात असलेलं अजून एक विष्णू मंदिर आहे, त्यात स्थापन केलेली आहे. इथे विष्णूची 24 अवतारांपैकी काळ्या पाषाणातली माधव मूर्ती बघायला मिळते. याच्याही प्रभावळीतील दशावतारही खास आहेत. योग नरसिंह, वराह, कुबेर, यक्षगण, सेविका, गरुड अशी जंत्रीच एकसंध मूर्तीवर कोरलेली आहे.

मेहकरचं आकर्षण असलेलं शारंगधर बालाजी मंदिर गावाच्या उत्तरसीमेवर आहे. या मंदिरातील मूळ बालाजीची मूर्तीसुद्धा गंडकी पाषाणातील आहे. या मूर्तीवरही दशावतार कोरलेले आढळतात. पण या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या किरीट मुकुटात स्थित असलेली आसनस्थ विष्णूची मूर्ती आहे. प्राचीन काळात मेघंकर नावाचा दैत्य या परिसरात फार उन्मत्त झाला होता. ऋषीमुनींना त्याने जेरीस आणले होते. सगळ्या तापसांनी भगवान विष्णूची आराधना केली आणि त्यांना विष्णू शारंगधर रूपात प्रसन्न झाले. शारंग या धनुष्याच्या मदतीने त्याने मेघंकर दैत्याचा वध केला म्हणून ही विष्णूप्रतिमा शारंगधर बालाजी या नावाने प्रचलित झाली. त्याच्या हातात शंख, चक्र, पद्म गदा आहे.

लक्ष्मी नृसिंह मंदिर हे अजून एक मेहकरचं वैशिष्ट्य. खरंतर या मूर्तीत लक्ष्मी नाही त्यामुळे नृसिंह मंदिर असं नाव हवं होतं. नृसिंह अवतारात विष्णूच्या हातात खड्ग, गदा, शंख, चक्र असून आणखी दोन हात कानाजवळ नेलेले असून त्यावर कमळं कोरलेली आहेत. पायाशी गरुड, प्रल्हाद, कोरलेले दिसतात.

अनेक खांब असलेली एका प्राचीन धर्मशाळेची भग्नावस्थेतली वास्तू बालाजी मंदिराजवळ आढळते. त्यातल्या खांबांवरचं कोरीव काम लक्षणीय आहे. मेहकर मधल्या या धर्मशाळेच्या पुरातत्वीय अवशेषांचे वर्णन जुन्या बुलढाणा जिल्हा गॅझेटियरमध्ये सापडतं. मेहकर येथील धामियाशाळा आत सुमारे 72 फूट चौरस आहे आणि ती खोल झाकलेल्या स्तंभाने बनलेली आहे. ज्यामध्ये 23 फूट चौरस आकाराच्या एका लहान मध्यवर्ती चौकोनाला वेढलेल्या खांबांच्या दोन ओळी आहेत, ज्यांवर छत नाही आणि ज्याचा फरसबंदी कोरीव कामाच्या पातळीपासून काही फूट खाली आहे. एकूण 60 खांब होते, त्यापैकी 25 अजूनही उभे आहेत आणि इतर अनेक शहराभोवती विखुरलेले आहेत. इमारतीचा बराचसा भाग आता कोसळला आहे. बालाजीचे नवीन मंदिर स्वतः पुरातन शास्त्रीय पद्धतीचं नाही, परंतु त्यात एक तुटलेली जैन प्रतिमा आहे, त्यावर एका लहान शिलालेखात संवत 1272 (इ.स. 1215) तारीख लिहिलेली आहे. शहराच्या पूर्वेला उंच जमिनीवर पंच पीर नावाचे एक जुने मुहम्मद-मेदन मंदिर आहे.

पूर्वी शहरात विणकर व मोमिनांचा एक समृद्ध समुदाय होता, मोमिन इतके श्रीमंत होते की सुमारे 500 वर्षांपूर्वी त्यांनी या जागी तटबंदीयुक्त गढी बांधली आणि वेशीवर पडलेला तट बांधला, जो अजूनही त्यांच्या नावाने ओळखला जातो. वेशीवरील एका शिलालेखात इ.स. 1488 ची तारीख नमूद आहे. पेंढाऱ्यांच्या आक्रमणाला सुरुवात होईपर्यंत हे शहर अत्यंत समृद्ध स्थितीत होते. इ.स. 1803 च्या दुष्काळासह या शहराचा ऱ्हास पूर्ण झाला. अजून एक ऐतिहासिक मध्ययुगीन पुरावा इथे उपलब्ध आहे. मेहकरच्या भिंतींमधील मोमिनांचा दरवाजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दरवाजावर कुराणाच्या सव्वीसव्या अध्यायातील मजकूर असलेला एक शिलालेख आहे. जो कालक्रमानुसार दरवाजाच्या बांधकामाची तारीख इ.स. 1488 नमूद करतो.

महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी मेहकर येथे काही काळ वास्तव्यास होते हे मेहकरचं अजून एक वैशिष्ट्य. त्यांचं व गोपाळकृष्णाचं मंदिरही गावात आहे. ही मूर्तीही काळ्या पाषाणातील आहे. याशिवाय इतर काही इतिहासकालीन वास्तू गावात दिसतात. गावात एक जुनी बारव आहे तिची स्थिती तितकी चांगली नाही. कंचनी महाल किंवा कसबिणीचा महाल म्हणून एक लहान विटांची भग्नावस्थेतली इमारत गावाच्या वायव्य दिशेला दिसते. या महालाजवळ एका चालुक्य काळातील मंदिराचे अवशेष सापडले आहेत. लोणार वेस, जानेफळ वेस अशा पुरातन वेशी आज इतिहासाचं प्रमाण जपताना दिसतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT