Maharashtra Politics
उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची विधानभवनात भेट झाली.  Pudhari
मुंबई

उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची विधानभवनात भेट; चर्चांना उधाण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनाच्या लॉबीत भेट झाली. हे दोन्ही नेते लिफ्टने विधानपरिषद सभागृहात जाण्यासाठी एकत्र गेले. या दोन नेत्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना भलतेच उधाण आले. तर यावर योगायोगाने झालेली भेट होती, असे उद्धव ठाकरे यांनी नंतर स्पष्ट केले.

दोन मिनिटांच्या भेटीने विधानभवनात चर्चेला उधाण

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सदस्य आहेत. ते विधान परिषदेत जाण्यासाठी विधानभवनाच्या तळमजल्यावरील लिफ्टच्या येथे उद्धव ठाकरे उभे होते. त्यांच्यासोबत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर होते. तेथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान परिषद सभागृहात जाण्यासाठी आले. तेव्हा ठाकरे आणि फडणवीस यांच्यात संवाद झाला. त्यानंतर लिफ्टने हे दोन्ही नेते विधान परिषद सभागृहात गेले. पण या दोन मिनिटांच्या भेटीने विधानभवनात चर्चेला उधाण आले.

आणखी काय योगायोग आहेत...

या भेटीबाबत अनिल परब यांना विचारले, असता ही केवळ योगायोगाची भेट होती. आता पुढे आणखी काय योगायोग आहेत हे मला माहीत नाही, असे उत्तर त्यांनी दिले. तर आम्ही योगायोगाने भेटलो. ते हिंदीत एक गाणं आहे, ना ना करते... प्यार.. पण असे काही नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

राजकीय मतभेद असावेत मनभेद नकोत

शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, राज्याच्या राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नाही. राजकीय मतभेद असावेत मनभेद नकोत, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे या भेटीतून वेगळा अर्थ काढणे चुकीचे आहे. ही भेट योगायोगाची असली तरी या भेटीबद्दल विधानभवनात खुमासदार चर्चा आमदार, अधिकारी आणि पत्रकारांमध्ये रंगल्या होत्या.

SCROLL FOR NEXT