MD Drug Case Main Mastermind Arrested By NCB
एमडी ड्रग्ज रॅकेट Pudhari File Photo
मुंबई

एमडी ड्रग्ज रॅकेटच्या मुख्य 'मास्टरमाईंड' जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

मुंबई, पुढारी ऑनलाईन डेस्क : एमडी ड्रग्ज रॅकेटच्या एका मुख्य आरोपीस अटक करण्यात मुंबई युनिटच्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. सुफियान खान असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने एनसीबी कोठडी सुनावली आहे. जून महिन्यांत या पथकाने नागपाडा आणि वडाळा येथून एका महिलेसह तिघांना अटक केली होती. या तिघांकडून या अधिकार्‍यांनी ३१ किलो ५०० ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जसहीत सुमारे ६९ लाखांची कॅश हस्तगत केली आहे.

जप्त केलेल्या एमडीची किंमत सुमारे ६१ कोटी रुपये होती. या कारवाईनंतर सुफियान हा पळून गेला होता. दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरात एमडी ड्रग्ज विक्री करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती प्राप्त होताच या अधिकार्‍यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. या कारवाईत पोलिसंनी मुर्शरफ, नौशीन आणि सैफ नावाच्या तीन आरोपींना अटक केली होती. मुर्शरफकडून दहा किलो एमडी ड्रग्ज, नौशीन या महिलेच्या घरातून साडेदहा किलो एमडी ड्रग्जसहीत सुमारे ६९ लाखांची कॅश आणि सैफकडून अकरा किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. या ड्रग्जची किंमत सुमारे ६२ कोटी रुपये इतकी किंमत होती. तपासात ही टोळी गेल्या एक वर्षांपासून एमडी ड्रग्ज तस्करीमध्ये सक्रिय होती. या कालावधीत त्यांनी अनेक ड्रग्ज पेडलरच्या मदतीने मुंबईसह आसपासच्या परिसरात ड्रग्जची विक्री केल्याचे उघडकीस आले होते.

सुफियान हा त्यांचा मुख्य सहकारी होता. त्याच्याच सांगण्यावरुन ही टोळी एमडी ड्रग्जची डिलीव्हरी करत होती. मात्र त्यांच्या अटकेनंतर सुफियान हा पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी एनसीबीने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना तो वाशीतील एका लॉजमध्ये लपला असल्याची माहिती या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने सोमवारी रात्री वाशीतील एका लॉजमधून सुफियानला अटक केली. तो ड्रग्ज सिंडीकेटचा म्होरक्या असून शिवडीतून संपूर्ण काम हाताळत होता. त्याच्याविरुद्ध ड्रग्ज तस्करीचे अनेक गुन्हे दाखल असून काही गुन्ह्यांत त्याला वॉण्टेड आरोपी घोषित करण्यात आले आहे. सुफियानच्या अटकेने अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अटकेनंतर त्याला मंगळवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला एनसीबी कोठडी सुनावली आहे.

SCROLL FOR NEXT