मुंबई : राजेश सावंत
मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, सायन रुग्णालयांची नावे आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जातात. अनेक गोरगरीब येथेच ठणठणीत बरे होतात. मात्र, महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांची अपोलो क्लिनिक या खासगी हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी दोन वर्षांसाठी पालिका 1 कोटी 42 लाख 40 हजार रुपये मोजणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला स्वतःच्या रुग्णालयांवर भरोसा नाय का? अशी विचारणा होत आहे.
मुंबई महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयांत प्रत्येक आजारावर उपचार होतो. वैद्यकीय तपासणीसाठीची प्रत्येक यंत्रणा येथे उपलब्ध आहे. असे असताना महापालिका हा खर्च का करीत आहे, असाही सवाल होत आहे.
महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 40 वर्षानंतरच्या कर्मचारी व अधिकार्यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी करण्यात येते. पूर्वी ही तपासणी महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये होत होती. मात्र आता अपोलो क्लिनिक या खासगी हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
2025 या वर्षात 1600 अधिकारी व कर्मचार्यांची आरोग्य तपासणी साठी प्रत्येकी 4,300 रुपये खर्च पडकून 68 लाख 80 हजार रुपये खर्च होणार आहे. तर 2026 मध्येही सरासरी 1600 कर्मचारी व अधिकार्यांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी 300 रुपये दर वाढवण्यात आला असून प्रत्येकी 4,600 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे महापालिकेला 73 लाख 60 हजार रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे या दोन वर्षाचा खर्च 1 कोटी 42 लाख 40 हजार रुपयांवर पोचणार आहे.
पालिका म्हणते, गर्दीमुळे खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी
मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी असल्यामुळे जवानांच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी 7 ते 8 महिन्यांचा कालावधी लागतो. त्यात काही चाचण्या महापालिका हॉस्पिटलमध्ये होत नाहीत. वेळ लागत असल्याने अग्निशमन दलाच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे पालिकेच्या अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.